20 February 2019

News Flash

हॅमस्टेड हीद, लंडन!

सुमारे २००० वर्षांपेक्षाही जुन्या असलेल्या लंडन शहराने आजवर अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत.

शहरातली जंगले

१९६२ मध्ये अमेरिकेत रेशेल कार्सन या लेखिकेच्या ‘सायलेंट स्प्रिंग’ या पुस्तकाने एकच खळबळ उडवून दिली. जगात पहिल्यांदाच औद्योगिकीकरणाविरुद्ध आणि त्याच्या विविध दुष्परिणामांची पर्यावरण, परिसंस्था या दृष्टिकोनातून दक्ष कार्यकर्त्यांच्या आवेगाने व शास्त्रीय पद्धतीने त्यात मांडणी केली गेली होती. सर्व रसायन उद्योगजगत या पुस्तकाविरुद्ध खळवळून उठलं; तर विविध स्वयंसेवी संस्था, पर्यावरण शास्त्रज्ञ लेखिकेच्या बाजूने उभे ठाकले. यानिमित्ताने निसर्ग व पर्यावरण संवर्धनासंबंधीची आस्था प्रथमच सामान्य जनतेसमोर आली.

..या पाश्र्वभूमीवर जगभरातील अशी हिरवी कवचकुंडले लाभलेल्या निरनिराळ्या शहरांचा वेध घेणारा विशेष विभाग..

सुमारे २००० वर्षांपेक्षाही जुन्या असलेल्या लंडन शहराने आजवर अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. ख्रिस्तपूर्व ४३ व्या साली ‘लंडनियम’ असे नामकरण करून रोमन लोकांनी स्थापना केल्यानंतर अँग्लो सॅक्सन, नॉर्मन यांच्या आक्रमणानंतर ब्रिटिश साम्राज्याचा उदय आणि काही शतकांनी या साम्राज्याचा ऱ्हासही पाहिला. १६ व्या शतकातील आगीचा कल्लोळ आणि अलीकडे २००७ साली झालेला अतिरेकी हल्ला अशा उलथापालथींना हे शहर आणि लंडनवासी ‘Keep Calm and Carry on’ या इथल्या रीतीला धरून सामोरे गेले आहेत. त्याबरोबरच लंडनचा विकास करताना एक गोष्ट मात्र प्रामुख्याने त्यांनी जपली, ती म्हणजे येथील हिरवाई! लंडनच्या जागतिक लोकप्रियतेत सतत भर पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे येथे पावलोपावली भेटणारी रम्य हिरवाई. चर्चच्या आवारातील फुललेली बाग, म्युझियम- आर्ट गॅलरीच्या आजूबाजूला रखवाली करणारी उंच झाडे- हे इथे सर्वसाधारणपणे दिसणारं दृश्य. यावर मात करतात ती हाईड पार्क, सेंट जेम्स पार्क, रीजंटस् पार्क, ग्रीन पार्क, ग्रीनिच, स्विडम पार्क ही मैलोन् मैल विस्तारलेली जंगलं. होय, यांना जंगलेच म्हटले पाहिजे. जरी ही मानवनिर्मित असली, तरीही इथे नैसर्गिक तलाव, झरे आणि दाट झाडी निर्माण करून पक्षी आणि जलचरांना वास्तव्यास अनुकूल वातावरण निर्माण केले गेले आहे. लंडन शहरातून नागमोडी वाहणारी थेम्स नदी अनेक स्थलांतरित पक्ष्यांना आकर्षित करते आणि शहराच्या दोन्ही काठांवर पसरलेली ही वनराईही त्यांना आपलेसे करते.

केवळ सेंट्रल लंडनमध्येच जवळपास चारशे हरित स्थळे (Green Space) आहेत. तर बृहन्लंडनमध्ये हजारो एकर जागा हिरवळीसाठी राखून ठेवलेल्या आहेत. नवे बांधकाम करताना या हरित मित्रांकडे तितकेच आपुलकीने पाहिले जाते. म्हणूनच नुकत्याच बांधलेल्या ‘वॉकी टॉकी’ या उंच काचेच्या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर झाडे लावून छोटय़ा जंगलाची निर्मिती केली गेली आहे.

एखाद्या दिवशी सुंदर उबदार ऊन पडले तर दुपारी गार्डनमध्ये जेवण घ्यायचे, हा इथला शिरस्ताच! भर शहराच्या धकाधकीतही इथे कोकिळाचे स्वर कानी पडणे नवलाचे नाही! हे बगीचे आणि विशाल उद्याने लंडन शहराचा एक अविभाज्य घटक आहेत.

१८४२ मध्ये लंडनच्या पूर्वेकडील हॅकनी येथे पहिले सार्वजनिक पार्क सुरू झाले. सेंट जेम्स, हाईड पार्क, रिजंटस् पार्क ही इथली ‘रॉयल पार्कस्’ पूर्वापार राजघराण्याच्या अखत्यारीत होती. अर्थात आज इथे सर्वसामान्यांही मुभा आहे. लंडनच्या या हरितक्रांतीत मोलाचा वाटा असेल तर तो येथील ‘कॉमनलँड’चा. इतर पार्कस्प्रमाणे या विस्तृत हरित भागात जाण्यास मर्यादित वेळा नसतात. इथल्या जंगलाचे काळजीपूर्वक जतन केले जाते. लंडनच्या उत्तरेला असलेले हॅॅमस्टेड हीद हे या शहरातील एक मोठे लक्षणीय जंगल.

I stood tip-toe upon a little hill,
The air was cooling, and so very still…

सुप्रसिद्ध कवी किट्स याने हॅमस्टेड हीदच्या एका छोटय़ा टेकडीवर विसावून रचलेले हे महाकाव्य. सुमारे ३२० हेक्टरवर पसरलेले हे रान १८७१ साली सार्वजनिक होण्यापूर्वी सर थॉमस विल्सन यांच्या अखत्यारीत होते. त्यावेळी ईस्ट हीद, सँडी हीद, वेस्ट हीद असा सुमारे ९० हेक्टरांवर पसरलेला हा हिरवा गालिचा आणि काही राजेशाही बंगले. हळूहळू जवळपासचा हरित पट्टा जोडून १९८१ पर्यंत येथे विस्तीर्ण जंगलच उभे राहिले. इथे असलेला अमेरिक थॉर्न ट्री (नावावरूनच समजावे, की याची पैदास अमेरिकेतच होते!) हा अख्ख्या इंग्लंडमध्ये आढळणारा एकमेव मोठा वृक्ष. ‘ळ६्र२३ी िळ१४ल्ल‘’ म्हणून प्रसिद्ध असलेला वृक्ष वसंतात चिमुकल्या सफेद फुलांनी सर्वाचे स्वागत करतो. इकडेतिकडे धावणाऱ्या खारी, मधूनच दर्शन देणारे कोल्हे (ते फारच माणसाळलेले वाटतात.), सराईतपणे लपणारे रानटी ससे आणि आपल्याच मस्तीत असणारे ग्रास स्नेक! पावसाळी दिवसांत इथे विविध प्रकारच्या बेडकांची मैफलच जमलेली असते. इथले तीन-चार तलाव बेडकांव्यतिरिक्त बदक आणि हंसांनाही आश्रय देतात. मोहक रंगांचे खंडय़ा पक्षी, सुतारपक्षी, दंगा करणारे पोपट, गोल्डफिंच, पाकोळ्या असे जवळपास दोनशे नानाविध प्रकारच्या पक्ष्यांमुळे पक्षीनिरीक्षकांसाठी ही एक पर्वणीच आहे. वसंत आणि ग्रीष्मात इथल्या तलावांशेजारी तसेच घनदाट वनराईत पक्षी हुडकण्यात सर्व वयोगटातले लोक मश्गूल असतात. लंडनवासीयांना अरण्यजीवनाचा अनुभव घेण्यासाठी काही उत्साही मंडळी कार्यशाळाही आयोजित करतात. त्याद्वारे पर्यावरण व निसर्गसंपदेविषयी जनजागृती केली जाते. वेबसाइट, फेसबुक, ट्विटरसारख्या संपर्कमाध्यमांद्वारे लोकांना निसर्गाच्या सान्निध्यात आणून त्यांच्यात ‘जगा आणि जगू द्या’ ही जाणीव निर्माण करण्यासाठी  प्रशासन व स्थानिक संस्था सक्रीय असतात.

dw-123

पहाटेच जॉगिंगला जाणाऱ्या उत्साही मंडळींच्या पायरवाने हीदला जाग येते. भर थंडीतही आपल्यासोबतच्या श्वानमित्रालाही उबदार कपडे घालून लोक इथल्या प्रसन्न वातावरणाचा आस्वाद घ्यायला येतात. सकाळचे चहापाणी झाले की वयस्कर मंडळी या वॉकिंग क्लबमध्ये हजेरी लावतात. मुलांना शाळेत सोडल्यावर छोटय़ाला बाबागाडीतून घेऊन आया इथे चहापानाकरता येतात. विस्तीर्ण पसरलेले हे जंगल या समस्त मंडळींचे तेवढय़ाच आपुलकीने स्वागत करते.

सुट्टीच्या दिवशी आणि वीकएंडला तर इथे जत्राच भरते जणू. दर शनिवारी इथे आठवडी बाजार असतो. ताज्या पदार्थाचा आणि फळांचा आस्वाद घेतल्यानंतर या वनराईत एखादी डुलकी काढण्याचा मोह कोणाला होणार नाही! त्यातून आळस झटकायचा असेल तर ऑलिम्पिकच्या धर्तीवर इथे धावण्याचा ट्रॅकही बांधलेला आहे. जवळच क्रिकेटचे मैदान आहे. टेनिसची आठ कोर्टस् आहेत. अगदीच काही नाही तर तलावात बुडी मारून ‘फ्रेश’ व्हावे. इथे पुरुष व स्त्रियांबरोबरच कुत्र्यांना पोहण्यासाठीही खास तलाव आहेत! एखादे चित्रप्रदर्शन बघायची हुक्की आली तर रानवाटेने ‘केनवूड हाऊस’ (ङील्ल६ िऌ४२ी) मध्ये जावे. १७ व्या शतकात बांधलेल्या या शाही राजगृहाची नुकतीच नव्याने डागडुजी करण्यात आली आहे. या महालाचा पूर्वीचा आब राखण्याचा प्रयत्न करून जनतेकरिता इथली दुर्मीळ चित्रे खुली केली गेली आहेत. अँथनी फॉन डायक, टर्नर, बाऊचर, थॉमस लॉरेन्स, रेम्ब्रां यांसारख्या कलाकारांची चित्रे निसर्गाच्या सान्निध्यात न्याहाळण्यात वेळ कसा जातो कळतही नाही. केनवूड हाऊसच्या आवारात हेन्री मूर, बार्बरा हेपवर्थ यांसारख्या आधुनिक शिल्पकारांच्या कलाकृतीही मांडल्या आहेत.

dw-124इथून थोडे पुढे गेलो की आपण जणू विषुववृत्तीय जंगलात शिरतो आहोत असाच भास होतो. घनदाट वृक्षराजीमुळे काही वेळा वरचे आकाशही दिसेनासे होते. एखाद्या चक्रव्यूहाप्रमाणे असलेल्या या जंगलातून बाहेर पडून एका टेकडीवर जाण्यासाठी एक विस्तीर्ण मैदान आपले स्वागत करते. हीदच्या जंगल सफारीच्या निसर्गरम्य अनुभवात येथील छोटय़ा टेकडय़ा मोलाची भूमिका बजावतात. इथली उंच टेकडी तर लोकांचे मोठेच आकर्षण ठरली आहे. धापा टाकत अत्यंत उंच चढण चढून जेव्हा आपण तिच्या टोकावर येतो तेव्हा तिथून दिसते दक्षिणेला पसरलेले विस्तीर्ण लंडन. हा लंडनचा उच्चतम भाग. सेंट पॉल्स कॅथड्रल, बी. टी. टॉवर्स, पार्लमेंट हाऊस, लंडन आय, नुकतेच बांधलेले शार्ड या लंडनच्या स्थित्यंतरांची साक्ष देणाऱ्या जगप्रसिद्ध वास्तू इथून न्याहाळता येतात.

भर शहरात असलेल्या या विहंगम निसर्गाचे कोणाला आकर्षण वाटणार नाही. पूर्वी अनेक नामवंत कलाकारांना इथल्या निसर्गाने भुलवले आहे. जवळच ‘किटस् हाऊस’ आहे. इथेच या चिरतरुण कवीने ‘डीि ३ ल्ल्रॠँ३्रल्लॠं’ी’ हे काव्य रचले. डी. एच्. लॉरेन्स, जॉर्ज ऑरवेल, डेरिस लेसिंग, लॉर्ड बायरन, एनिड ब्लायटन यांसारख्या लेखक-लेखिकांनी हीद परिसरात काही काळ व्यतीत केलेला आहे. इथल्या जॉन किटच्या घराचे रूपांतर म्युझियममध्ये करण्यात आले आहे. दरवर्षी तिथे काव्यवाचनाचा कार्यक्रम होतो. किटची प्रेयसी फॅनी ब्राऊन त्याच्या अकाली निधनाने व्याकूळ होऊन हीदच्या जंगलात एकटीच भटकत असे. त्यांच्या अजरामर प्रेमकहाणीने प्रेरित होऊन की काय, आजही हीदमध्ये प्रेमिकांचे थवे दिसतात.

गेली अनेक वर्षे मी हीदला जातो आहे. त्याच्या भव्य विस्तीर्णतेखेरीज इथली वनराई न्याहाळण्यात वेळ कसा जातो कळत नाही. मित्रांसोबत गप्पांच्या ओघात पायवाटाही एकमेकांत गुंतत जातात. छोटे तलाव, विस्तीर्ण वृक्ष, मधूनच विहरणारे मोहक पक्षी, झुडपांत एखादा कोल्हा लपला आहे असा होणारा भास आणि वाऱ्याची एखादी सुगंधित झुळुक.. सारेच मन हिरवे करणारे.
प्रशांत सावंत

First Published on February 8, 2016 10:53 am

Web Title: hampstead heath london