करोना संकटाच्या काळात व्हेंटिलेटरची कमतरता लक्षात घेऊन त्याचा पुरवठा पीएम केअरमधून करण्यात आला होता. ते व्हेटिंलेटर बसविल्यानंतर आता निकृष्ट असल्याचे समोर आलं आहे. काँग्रेसचे आमदार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय शिक्षण विभागाने केलेल्या प्राथमिक लेखा परिक्षणात पीएम केअर फंडामधूनन राज्याच्या १९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना पुरविल्या गेलेल्या १,३५२ व्हेंटिलेटरपैकी २४३ हे खराब असल्याचे समोर आले आहे. करोना काळात उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना पीएम केअर फंडातून व्हेंटिलेटर देण्यात आले होते. मात्र त्यापैकी काही व्हेंटिलेटर हे दुरुस्ती पलीकडे गेल्याचे समोर आले आहे.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक (डीएमईआर) तात्याराव लहाने यांनी टाईम्स ऑफ इंडियाला या संदर्भात माहिती दिली आहे. व्हेंटिलेटरच्या गुणवत्तेबाबतच्या अनेक तक्रारी मिळाल्यानंतर त्याची तपासणी करण्यासाठी हे ऑडिट करण्यात आल्याचे लहाने यांनी सांगितले. “व्हेंटिलेटरची तपासणी केल्यानंतर काही दुरुस्तीच्या पलीकडे आहेत. आम्ही हे आरोग्य मंत्रालयाकडे देऊन निश्चित वेळेत बदलून देण्यात येतील अशी विनंती करत आहोत. सध्याची परिस्थिती लक्षात घेता आम्हाला तातडीने व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे, ”लहाने म्हणाले.

आणखी वाचा- फडणवीस व चंद्रकांत पाटलांनी ते व्हेंटिलेटर सुरू करून दाखवावेत; काँग्रेसचं आव्हान

अधिकृत आकडेवारीनुसार, मार्च २०२१ पूर्वी राज्याला ७६२ व्हेंटिलेटर मिळाले. त्यानंतर ३० एप्रिलआधी उर्वरित ५९० व्हेंटिलेटर मिळाले. त्यापैकी ८६२ हे वापरात आहेत. २४३ हे नादुरुस्त आहेत तर ८५ व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांना देण्यात आले आहेत, तर १५६ व्हेंटिलेटर काही काळात वापरात येणार आहेत.

‘पीएम केअर’ निधीतून पुरविण्यात आलेले १५० व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे असून त्याचा उपयोग करता येणार नाही, असे औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांनी सर्वात आधी सांगितले होते. त्यानंतर काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी व्हेंटिलेटर पुरवठा प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप केला होता.