करोनाची रुग्णसंख्या वाढतच असून शुक्रवारी २९ नवे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची नोंद १११८ इतकी झाली आहे.

शुक्रवारी सायंकाळपयंत श्रीनाथवाडी, राहुल नगर, सिद्धार्थ नगर, बर्तन बाजार, खोलापुरी गेट, अंबापेठ, बेलपुरा, गोपाल नगर, जुनी वस्ती बडनेरा, भुतेश्वर चौक, दस्तूर नगर, सातुर्णा, जमील कॉलनी, धानोरा (जोग), वलगाव, थुगाव पिंपरी, वाठोडा शुक्लेश्वर येथून एकूण २९ करोनाबाधित आढळून आले.

करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता वलगाव आणि व्हीएमव्ही महाविद्यालयातील विलगीकरण कक्षाचे आता कोविड केंद्रांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. यामध्ये तब्बल ३५० रुग्णावर उपचार करता येणार आहेत. या दोन्ही केंद्रांमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. वलगाव येथील केंद्रामध्ये ३ सभागृह व ३६ खोल्या उपलब्ध असून या ठिकाणी २०० रुग्णांवर उपचार करता येऊ शकतात तर व्हीएमव्ही महाविद्यालयातील केंद्रामध्ये जवळपास १५० रुग्ण उपचार घेऊ शकतात, त्यामुळे येणाऱ्या काळात वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता प्रशासनाने या दोन्ही ठिकाणी आधीच पुरेशी व्यवस्था करण्याची खबरदारी घेतली आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये असलेल्या कोविड रुग्णालयात नवजात शिशूंसाठी एनआयसीयू कक्षाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. या व्यवस्थेमुळे नवजात शिशूंच्या प्रकृतीवर  देखरेख आणि त्यांच्यावर उपचार करणे सोयीचे होणार आहे. रुग्णालयात उपचार घेत असताना रुग्णाचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणे देखील तितकेच गरजेचे असते त्यामुळे आयुष कक्षाच्या साहाय्याने कोविड रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांकरिता मानसोपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन सुरू करण्यात आले. डॉ. श्रीरंग ढोले यांच्या रुग्णालयात असलेल्या कोविड सेंटरमध्ये हा प्रयोग सुरू करण्यात आला असून त्याला रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.