इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील आयडीबीआय बँकेचे स्ट्राँगरूम फोडून तब्बल १२ किलो सातशे ग्रॅम सोने चोरीला गेल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. बँकेत फर्निचरचे काम करणाऱ्या परप्रांतीय कारागिरांनीच ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांनी या कारागिरांचा शोध सुरू केला आहे. बाजारपेठेत या सोन्याची किंमत साडेतीन कोटी रुपयांच्या आसपास आहे.
पोलीस व बँक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पळसदेव येथे मुख्य रस्त्यावर गजबजलेल्या ठिकाणी आयडीबीआय बँकेची शाखा आहे.
गेल्या १५ दिवसांपासून या बँकेत फर्निचरच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. ठेकेदाराने या बँकेत तीन कारागीर फर्निचरच्या कामासाठी पाठविले होते. मागील १५ दिवसांपासून रात्रपाळीतही हे कारागीर फर्निचरचे काम करीत होते. त्यानुसार शनिवारी रात्रीही बँकेत फर्निचरचे काम सुरू होते.
 कारागिरांकडे कटर, ड्रील मशीन व अन्य अवजारे होती. शनिवारी रात्री या कारागिरांनी बँकेची स्ट्राँगरूम अवजारांनी फोडली व आतील लॉकर्सपैकी तीन मोठय़ा आकाराचे बँकेकडे तारण असलेल्या दागिन्यांचे लॉकर फोडले. त्यातील १२ किलो ७०० ग्रॅम सोने त्यांनी पळविले. चोरीला गेलेले सोने हे २१६ कर्जदारांनी बँकेकडे तारण ठेवले होते.
बँकेतील अन्य लॉकर्स सुरक्षित असून बँकेची अन्य रोख रक्कम व वैयक्तिक लॉकर सुरक्षित असल्याचे बँकेचे शाखाधिकारी रोही यांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक ए. ए. देशमुख यांनी सांगितले की, बँकेत फर्निचरचे काम सुरू होते.
त्यामुळे स्ट्राँगरूम फोडताना होणाऱ्या आवाजाबाबत लोकांना संशय आला नाही. ठेकेदाराच्या माध्यमातून संबंधित कारागिरांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. दागिने ठेवलेल्या रिकाम्या पिशव्या त्याचप्रमाणे कामाचे सर्व साहित्य तेथेच ठेवून कारागीर पळून गेल्याचे आढळून आल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला.  
पोलीस या कारागिरांचा शोध घेत आहेत.