लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : अकोला जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या करोना रुग्ण संख्येने सोमवारी सहाशेचा टप्पा ओलांडला आहे. आणखी एका महिलेचा बळी गेला असून, २४ नव्या रुग्णांची भर पडली. जिल्ह्यात आतापर्यंत ३४ जणांचे बळी गेले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ६०५ वर पोहोचली. सध्या १२९ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अकोला जिल्ह्यात करोनाचा कहर कायम असून रुग्ण व मृत्यू संख्या वाढतच आहे. सोमवारी आणखी एक मृत्यू आणि २४ नवीन रुग्णांची नोंद झाली. उपचारासाठी अकोल्याहून नागपूरला पाठवलेल्या महिलेचा रविवारी मृत्यू झाला होता. त्याची नोंदही प्रशासनाने सोमवारी घेतली. जिल्ह्यातील एकूण १०७ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ८३ अहवाल नकारात्मक, तर २४ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. दरम्यान, सोमवारी दुपारी सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान एका ५५ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. ती महिला रुग्ण फिरदोस कॉलनी येथील रहिवासी होती. २९ मे रोजी त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आज सकाळच्या अहवालानुसार २४ जण नवे करोनाबाधित आढळून आले. त्या रुग्णांमध्ये पुरुष व महिला प्रत्येकी १२ आहेत. यामध्ये रामदास पेठ येथील पाच, हरिहर पेठ तीन, कमला नगर, आंबेडकर नगर प्रत्येकी दोन, तर खैर मोहम्मद प्लॉट, सिंधी कॅम्प, खदान, गुरुनानक नगर, रणपिसे नगर, मुजफ्फर नगर, अनिकट, नुरानी मशीद जवळ खदान, खडकी, सरकारी गोदाम खडकी, भरतनगर व पोपटवाडी मूर्तिजापूर येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळच्या अहवालानुसार एकही सकारात्मक रुग्ण आढळून आलेला नाही. ४९ अहवाल नकारात्मक आले. करोनाबाधितांच्या जवळून संपर्कात आलेल्यांची तात्काळ तपासणी करून नमुने घेण्यात येत आहेत. शहरात प्रत्येकाची आरोग्य तपासणी करण्याची मोहीम राबविली जात आहे. मृत्यूचे प्रमाण व वाढत्या रुग्ण संख्येवर अद्यापही नियंत्रण मिळवता आलेले नाही.

आतापर्यंत ४४२ रुग्ण बरे झाले
अकोला जिल्ह्यात जोमाने रुग्ण वाढत असले तरी, त्यातून बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. आतापर्यंत ६०५ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ४४२ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यात आज सोडण्यात आलेल्या १० जणांचा समावेश आहे. त्यातील आठ जण संस्थात्मक विलगीकरणात निरीक्षणाखाली, तर दोन जणांना घरी सोडण्यात आले. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७३.०५ टक्के आहे.

शहरातील ११४ परिसर प्रतिबंधित
अकोला शहराला करोनाने विळखा घातला. शहरात करोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे सत्र सुरूच आहे. शहरातील बहुतांश भागाला करोनाने व्यापन घेतले आहे. करोनाबाधित रुग्ण आढळून येणारा परिसर महापालिकेकडून प्रतिबंधित करण्यात येतो. त्याभागात अनेक निर्बंध आहेत. शहरातील अशा ११४ परिसरांची यादी महापालिकेने जाहीर केली आहे. या भागांमध्ये शेकडो मालमत्ता असून, हजारो नागरिक रहिवासी आहेत.