आम आदमी पक्षाने बुधवारी वस्त्रोद्योग राज्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला. खोतकर यांनी पदाचा गैरवापर करून आपल्या जवळच्या लोकांना नाममात्र किमतीमध्ये जालन्यातील ४० दुकानांचे वाटप केल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन-शर्मा यांनी केला. त्याचबरोबर खोतकरांनी लाखो रुपये लाटल्याचाही आरोप त्यांनी केला.
अर्जुन खोतकर यांच्यावरील आरोपांची माहिती देण्यासाठी प्रीती मेनन-शर्मा यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी खोतकर यांच्यावर गंभीर स्वरुपाच्या घोटाळ्याचे आरोप केले. त्या म्हणाल्या, जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारात अनेक गैरप्रकार झाले आहेत. लेखा परीक्षकांनीही आपल्या अहवालामध्ये गैरप्रकारांवर बोट ठेवले आहे. बाजार समितीच्या कागदोपत्री रेकॉर्डमध्ये जाणून बुजून अनेक पाने रिकामी ठेवण्यात येते आणि त्यामध्ये नंतर गरजेप्रमाणे माहिती दिली जाते. याच गैरप्रकारांमुळे अर्जुन खोतकरांनी आपल्या जवळच्या व्यक्तींचा फायदा करून दिला आहे. येथील दुकाने अगदी नाममात्र शुल्कामध्ये वाटण्यात आली. बाजारभावाप्रमाणे ४० लाख रुपये किंमत असलेली दुकाने ५० हजार, एक लाख रुपये अशा किंमतीना विकण्यात आली. त्याचबरोबर खोतकरांविरोधात बोलणाऱ्यांची हत्या करण्यात येते, असाही आरोप प्रीती मेनन-शर्मा यांनी केला. दरम्यान, या आरोपांसंदर्भात अर्जुन खोतकर यांची बाजू समजलेली नाही.