दुधाचा टेम्पो आणि बोलेरो जीपमध्ये झालेल्या अपघातात एका नवरदेवासह दोघांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज (बुधवार) पहाटे साडेपाचच्या सुमारास औरंगाबाद-बीड रस्त्यावर घडली. लग्नानंतर देवदर्शनासाठी गेल्यानंतर नवरदेवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात नवरदेवासह आणखी एक जण मृत्यूमुखी पडला असून सुमारे सहा जण यात जखमी झाले आहेत. अमित गोडसे (रा. खेडगाव ता. अंबड जि. जालना) असे नवरदेवाचे नाव आहे. अपघात इतका भीषण होता की, बोलेरोचा चक्काचूर झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अधिक माहिती अशी, औरंगाबादेतील गोडसे कुटुंबीय मुलाच्या लग्नानंतर देवदर्शनासाठी तुळजापूर येथे गेले होते. देवदर्शन आटोपून ते औरंगाबादकडे निघाले होते. नवरदेव स्वत: बोलेरो गाडी चालवत होता. पहाटे गाडी अंबडजवळच्या खेड गावाजवळ आली असता समोरून येणाऱ्या दुधाच्या टेम्पोला बोलेरोची जोरात धडक बसली. यात नवरदेव अमित शंकर गोडसे व त्याची मावस बहीण वंदना शिवाजी चौधरी हे दोघे जागीच ठार झाले. तर बोलेरोतील शिवाजी नारायण चौधरी, शहाजी नानासाहेब लांडगे, जोत्स्ना जनार्दन गोल्डे यांच्यासह नववधू हे सर्व जखमी झाले आहेत. जखमींवर औरंगाबादच्या घाटीत उपचार सुरू आहेत, अशी माहिती गोंदी (जि. जालना) पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल परजणे यांनी दिली. अमित गोडसे व अश्विनी अमित गोडसे यांचा ४ मे रोजी लग्न झाले होते. या घटनेमुळे गोडसे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.