अवैध वाळूउपसा आणि वाहतूक यावर कडक नजर ठेवण्यासाठी नूतन जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंग यांनी गावपातळीवर पथकांची स्थापना केली असून, गेल्या तीन दिवसांपासून प्रशासनाने मोठय़ा प्रमाणात अवैध वाळूउपसा करणाऱ्यांवर कारवाई केली. तब्बल २३०० ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून, यातील दोषींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जाणार आहेत. शहरातही अवैध वाळूसाठा जप्त करण्यात येत असून, दोन दिवसांपूर्वी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री तीन वाजेपर्यंत वाळूउपसा होणाऱ्या परिसराची पाहणी केली. २४ तास उपशावर व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावपातळीपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
 जिल्हाधिकाऱ्यांनी वाळूउपसा करणाऱ्या ठिकाणांवर लक्ष्य केंद्रित केले असून, शहरातील अवैध वाळूसाठेही जप्त केले जात आहे. वेगवेगळय़ा पथकांनी गेल्या तीन दिवसांत तब्बल २३०० ब्रास वाळू जप्त केली आहे. ग्रामीण भागातून उपसा होत असल्याने त्या गावात सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्यासह पथकांची स्थापना करण्यात आली आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी वाळूचा उपसा अधिक मोठय़ा प्रमाणात होऊ शकतो, असे गृहीत धरून पुढील १५ दिवसांसाठी २४ तास नजर ठेवता यावी, यासाठी प्रत्येकी तीन पथके स्थापन करण्यात आली आहे. पथकांचे गठन झाल्यानंतर केवळ आदेश देऊन जिल्हाधिकारी कार्यालय अंग काढून घेते आहे, असे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही वाटू नये म्हणून स्वत: जिल्हाधिकारी या कारवाईत सहभागी झाले. अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एल. चोरमारे यांच्यासह त्यांनी अगदी उशिरा रात्रीपर्यंत वाळूपट्टय़ात पाहणी केली.
तहसील व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या स्तरावरही अवैध वाळूउपसा व वाहतूक रोखण्यासाठी पथके गठीत केली असून त्याचा परिणाम दिसत असल्याचा दावा महसूल प्रशासनाने केला आहे. या पथकांमध्ये पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी यांचाही सहभाग असल्याने सर्व विभागांकडून कारवाई केली जात आहे. अवैध वाळूउपसा होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या आहेत. तरीदेखील कोणी महसूल बुडवून अवैधपणे वाळूउपसा करेल, त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे वीरेंद्र सिंग यांनी सांगितले.