अपुऱ्या पाण्यामुळे कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले असून जलप्रदूषणामुळे पात्रातील जलचराचा मोठय़ा प्रमाणात मृत्यू होत आहे. नदीपात्रातील डोहामध्ये मृत माशांचा खच पडल्याने दरुगधीयुक्त पाण्याचा वापर नदीकाठच्या गावांना होत असून सांगलीत पाणी कपात करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
यंदा कोयना धरणातील पाणीसाठा अपुऱ्या पावसामुळे कमी झाला आहे. दिवाळीपूर्वीच कोयना धरणातील पाणीसाठा ७६ टक्क्यांवर आला असून मृतसाठा वगळता हे पाणी पुढील पावसाळी हंगाम सुरू होईपर्यंत टिकवणे आवश्यक असल्याने आतापासूनच पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. याचा फटका कृष्णा नदीकाठाला मोठय़ा प्रमाणात बसू लागला आहे.
नदीपात्रातील पाण्याची पातळी कमालीची घटली असून प्रवाह केवळ अध्र्या फुटाचा राहिला असला तरी तोही सखल भागातील आहे. ठिकठिकाणी असणाऱ्या डोहात पाणी साठले असून उपसा असाच सुरू राहिला तर तोही पाणीसाठा आठपंधरा दिवसांत संपण्याची चिन्हे आहेत.
नदीमध्ये गणपती व दुर्गामूर्तीचे विसर्जन करण्यात आले होते. पात्रातील पाणीच प्रवाहित नसल्याने अनेक ठिकाणी या मूर्ती उघडय़ावर आल्या आहेत. सांगली महापालिकेने कोरडय़ा पडलेल्या नदीच्या पात्राची स्वच्छता हाती घेतली असून जेसीबीच्या साहायाने पात्र स्वच्छ करण्यात येत आहे.
नदीचे प्रदूषित पाणी प्रवाहित नसल्याने मिरज, ढवळी, म्हैसाळ येथे मोठय़ा प्रमाणात मासे मरून काठाला येत आहेत. मृत होणाऱ्या माशांमध्ये प्रामुख्याने कानसी, आरली, तांबुडक, रूह, करक या जातींचा समावेश आहे. या माशांना पाण्यात पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याने मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे मच्छिमारांनी सांगितले. कृष्णेच्या पात्रात याच माशांची पदास मोठय़ा संख्येने आहे.
दरम्यान, कृष्णा कोरडी पडू लागल्याने शहराच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सांगली व कुपवाडसाठी दररोज सुमारे १०० एमएलडी पाण्याची गरज भासते. पात्रातील पाणीसाठा झपाटय़ाने कमी होऊ लागल्याने शहराला पाणी कपातीला सामोरे जावे लागणार असून तसा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असल्याचे आयुक्त अजिज कारचे यांनी सांगितले. जानेवारीपर्यंत १० टक्के पाणी कपातीचा प्रस्ताव असून त्यानंतर या कपातीत आणखी वाढ केली जाण्याची शक्यता आहे.