हजारे यांचे स्पष्टीकरण

भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या २३ मार्चपासून दिल्लीत सुरू होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी प्रतिज्ञापत्र करून देणे बंधनकारक नसून केवळ जबाबदारी सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांसाठीच प्रतिज्ञापत्राचे बंधन असल्याचा खुलासा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी केला.

२३ मार्च पासून सुरू होणाऱ्या आंदोलनात चारित्र्यशील लोकांनी सहभागी व्हावे ही अपेक्षा आहे. त्यामुळे आंदोलनाशी जोडणाऱ्या कार्यकर्त्यांचे प्रतिज्ञापत्र घेण्याचा निर्णय केंद्रीय मध्यवर्ती समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. या प्रतिज्ञापत्रासंदर्भात अनेक लोकांमध्ये शंका आहेत. परंतु प्रतिज्ञापत्र सर्वासाठी बंधनकारक नाही. जे कार्यकर्ते कायमस्वरूपी आंदोलनाशी संलग्न राहू इच्छितात, तालुका, जिल्हा तसेच राज्य पातळीवरील जबाबदारी घेउ इच्छितात, ज्यांची राष्ट्रीय कोअर कमिटीवर निवड करण्यात आली आहे, जे आंदोलनाचे प्रवक्ते म्हणून काम पाहणार आहेत अशाच कार्यकर्त्यांसाठी प्रतिज्ञापत्र बंधनकारक ठेवण्यात आले आहे.

जे कार्यकर्ते पहिल्यापासून  त्यांच्या स्वयंसेवी संस्थेमार्फत समाजकार्य करीत आहेत, त्यांच्यासाठीही प्रतिज्ञापत्राची आवश्यकता नाही. असे कार्यकर्ते त्यांच्या संस्थेबरोबरच भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचेही काम करू शकतात. आंदोलनासमवेत प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर पूर्वीच्या संस्थेबरोबर देखील संबंधित कार्यकर्त्यांस काम करता येईल. प्रतिज्ञापत्राबरोबरच अशा कार्यकर्त्यांनी त्यांचे शुद्ध विचार, शुद्ध आचार, त्याग करण्याची इच्छा व देश व समाजाची सेवा करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे हजारे यांनी म्हटले आहे.