अकोला महापालिका निवडणुकीत येथे भाजप विरुद्ध इतर पक्ष, असे चित्र निर्माण झाले आहे. बहुमताचे समीकरण जुळवून आणण्यासाठी भाजप नेत्यांनी धडपड सुरू केली असून, इतर पक्षांसह बंडखोरी व अंतर्गत कलहाचे मोठे आव्हान भाजपला पेलावे लागत आहे.

महापालिका निवडणुकीपूर्वीच अकोल्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. दिग्गज उमेदवारांना आपल्या गळाला लावण्यासाठी सर्वच पक्षांनी साम, दाम, दंड, भेदाचा वापर केला. या महापालिकेच्या निवडणुकीत प्रथमच युती व आघाडी न करता चारही प्रमुख पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. निष्ठावंतांना डावलून सर्वच पक्षांनी आयारामांना संधी दिल्यामुळे बंडखोरांसह पक्षातील अंतर्गत कलहाचा धोका सर्वच पक्षांपुढे आहे. २० प्रभागांतील ८० जागांसाठी ५७९ उमेदवार िरगणात आहेत. गेल्या ५ वर्षांच्या कार्यकाळात पहिले अडीच वर्षे काँग्रेस, भारिप-बमसं व राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यानंतर अडीच वर्षे भाजप व शिवसेना सत्तेत होती. आता सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढत असल्याने कोणत्याही एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवणे कठीण होणार आहे. सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपने ७४ जागांवर उमेदवार दिले असून, त्यापकी एक जागा रिपाइंसाठी सोडली आहे. यावेळी प्रथमच भाजपने ४ मुस्लीम उमेदवार दिले आहेत. भाजपने धक्कातंत्राचा वापर करत विद्यमान महापौर उज्ज्वला देशमुख, योगेश गोतमारे, कल्पना गावंडे, गोपी ठाकरे, नम्रता मोहोड या ५ जणांना उमेदवारी नाकारली. काही निष्ठावंतांनाही डावलून गेल्या वेळेस बंडखोरी करणाऱ्यांना किंवा आयत्या वेळी पक्षात प्रवेश घेतलेल्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे भाजपला बंडखोरांसह अंतर्गत नाराजीचा सामना करावा लागणार आहे.

अकोला भाजपमध्ये खासदार संजय धोत्रे व पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, असे दोन गट आहेत. दोन्हीही गट एकमेकांना मात देण्याची संधी सोडत नाही. संघटनेवर धोत्रे गटाचे वर्चस्व आहेत. मनपा निवडणुकीची धुरा सांभाळणाऱ्या खासदार गटाने डॉ. रणजित पाटील यांच्या गटातील अनेकांची तिकिटे कापून राजकीय वचपा काढला. भाजपने ५१ जागांचे लक्ष्य निश्चित केले आहे.

राष्ट्रवादीचा संघर्ष

भाजपनंतर सर्वाधिक चच्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून त्यांनी ७४ उमेदवार िरगणात उतरवले आहेत. विधानसभा निवडणुकीपासून अकोल्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांनी मनपा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला फोडून अनेक नगरसेवकांचा राष्ट्रवादीत आणले. शिवसेनेचे  मातब्बर नेते व माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन राष्ट्रवादीने व्यूहरचना आखली असून, अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ मजबूत करण्याकडे देशमुख यांचा कल आहे. मनपा निवडणुकीत इतर पक्षांतील असंतुष्टांना हेरून त्यांना उमेदवारी देण्यावर राष्ट्रवादीने भर दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी, भारिप-बमसं, एमआयएम या पक्षांची मदार मुस्लीम मतांवरच आहे.

काँग्रेसला फटका

या निवडणुकीत सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला. काँग्रेसचे नगरसेवक पक्षाला सोडून गेले. काँग्रेसमध्ये  अंतर्गत गटबाजी असून, कार्यकर्त्यांपेक्षा नेतेच जास्त झाले आहेत. महानगराध्यक्ष बबन चौधरी यांची निवड झाल्यापासून पक्षात नाराजीचे वातावरण असून त्यांच्या कार्यपद्धतीवरही अनेकांचा आक्षेप आहे. परिणामी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी प्रचारसभा अवघ्या काही मिनिटांत गुंडाळली.  शिवसेनेनेही भाजपएवढेच ७३ उमेदवार दिले आहेत. मनपाची हद्दवाढ भारिप-बहुजन महासंघासाठी लाभदायक ठरू शकते.