राज्य सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना मानसोपचाराची गरज असल्याने त्यांना आधी मानसोपचार केंद्रात दाखल करा, अशी खरमरीत टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी गुरुवारी येथे केली. धरणांच्या किती किमती कोणी वाढवल्या हे बोलायला नको. ते सर्वानाच माहीत आहे, असे सांगत विखे यांनी राष्ट्रवादीलाही अप्रत्यक्षरीत्या लक्ष्य केले.
विखे यांनी गुरुवारी जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला. शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य सरकारला दुष्काळाचे कोणतेही गांभीर्य नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी मदत करण्याऐवजी जिल्हास्तरावर मानसोपचार केंद्र स्थापन करीत आहे. शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची हौस नाही. मंत्र्यांचेच मानसिक संतुलन बिघडल्याने मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाला मानसोपचाराची गरज असल्याने त्यांना आधी अशा केंद्रात दाखल करा, अशी भावना विखे यांनी व्यक्त केली.
मंत्र्यांमध्ये विसंवाद आहे. कोण काय बोलतंय त्यांनाही माहीत नाही. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाची पाहणी केली नसून ते पर्यटनासाठी आले होते. केंद्रीय पथक व मंत्र्यांचे दौरे हे सर्व नाटक असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्री नुसती भाषणबाजी करीत आहेत. मग ते कृतीत का आणत नाहीत, असा सवालही विखे यांनी केला. सध्या सरकार नावाची व्यवस्था अस्तित्वात नाही. शेतकरी आत्महत्येची परवानगी मागत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे. मात्र, सरकार नियमांच्या भोवती फिरत आहे. सर्व मंत्री अज्ञानी आहेत. ते जनतेच्या भावनेशी खेळत आहेत. स्थिती अशीच राहिली तर येत्या काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि याची सर्व जबाबदारी राज्य सरकारवर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना-भाजपमध्ये कोणताही सुसंवाद नसून त्यांच्यात श्रेष्ठत्वावरून वाद सुरू आहेत. शिवसेनेला शेतकऱ्यांचे काही देणे-घेणे नाही. सत्तेसाठी लोटांगण घेणारा हा पक्ष आहे, अशी टीकाही विखे यांनी केली.
मी कधीच जायकवाडीचे पाणी अडवले नाही. तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी मराठवाडा व नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची या पाण्यासंदर्भात बठक का बोलावली नाही, केवळ प्रादेशिक वाद निर्माण केला गेला, असाही आरोप त्यांनी केला. जायकवाडीच्या पाणीवाटपासंदर्भात कोणत्याही बठकीला मी कधीही तयार होतो आणि राहणार. दहा वर्षांपूर्वी जायकवाडी शंभर टक्के भरले असताना सिंचनासाठी केवळ २७ टक्केच पाण्याचा वापर का केला गेला, पाण्याची मागणी नसल्याने तत्कालीन सरकारला वरच्या धरणातून पाणी सोडण्याची गरज वाटली नाही, असेही त्यांनी सांगितले.
धरणांच्या किमती किती आणि कोणी वाढवल्या हे बोलायला नको. हे सर्वानाच माहीत आहे, असे सांगत विखे यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केले. झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसने संपूर्ण तयारी केली आहे. गावागावात ग्रामसभेत ठराव घेऊन शेतकऱ्यांच्या भावना राज्य व केंद्र सरकापर्यंत पोहोचविण्यासाठी काँग्रेस कामाला लागणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आपण राज्य सरकारकडे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली असून, या अधिवेशनात विरोधी पक्ष संपूर्ण सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.
युवक काँग्रेसने दुष्काळप्रश्नी गुरुवारी सामूहिक उपोषण केले. या ठिकाणी विखे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख, माजी खासदार तुकाराम रेंगे, सुरेश वरपूडकर, उपमहापौर भगवान वाघमारे, नागसेन भेरजे, नदीम इनामदार, बाळासाहेब देशमुख, सिद्धार्थ हत्तीअंबीरे आदींची उपस्थिती होती.