अवकाळी पाऊस व गारपिटीने संसार उद्ध्वस्त झाल्यानंतरही राज्य सरकारने मदतीचा हात पुढे न केल्याने हताश झालेल्या माहूर व किनवट तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. आतापर्यंत जिल्ह्यात ६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद पोलीस दफ्तरी झाली आहे.
किनवट तालुक्यातील बुधवार पेठ येथील शेतकरी ओंकार सीताराम चुकनाके (वय ३५) यांचे एकत्रित कुटुंब आहे. आपल्या ७ एकर जमिनीत सोयाबीन, हरबरा, गहू ही पिके त्यांनी घेतली होती. हाताशी आलेल्या सोयाबीन पिकाची अतिवृष्टीमुळे नासाडी झाली. रब्बी हंगाम साथ देईल, या आशेवर जगत असलेल्या चुकनाके यांचे गारपीट व अवकाळी पावसाने कंबरडेच मोडले. कर्जाचा डोंगर, चार बहिणींच्या लग्नाची जबाबदारी अशा चक्रात कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत चुकनाके यांनी बुधवारी शेतात विषारी औषध प्राशन करून मृत्यूला कवटाळले.
अन्य एका घटनेत माहूर तालुक्यातील जांझी येथील अनिल प्रेमसिंग आडे (वय ३२) या शेतकऱ्याने गारपीट व नापिकीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दुपारी २ वाजता हा प्रकार घडला. अनिल आडे यांचे एकत्र कुटुंब आहे. त्यांच्या आईच्या नावे तीन एकर शेती आहे. खरीप हंगामाचे अतिवृष्टीने, तर रब्बी हंगामाचे गारपिटीमुळे नुकसान झाले. आईच्या नावे असलेले बँकेचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत असलेल्या आडे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. या प्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
गारपिटीने जिल्ह्यात आतापर्यंत सहाजणांचा बळी घेतला. लोहा तालुक्यात माळेगावच्या संतुका गंगवणे या शेतकऱ्याने आधी आत्महत्या केली. त्यानंतर ५-६ दिवसांनी गोलेगावच्या संतुका गारोळे यांनी कंधार येथे विष घेऊन आत्महत्या केली. भोकर तालुक्यातील सिनगारवाडी येथील शेतकरी मारोती जिल्हेवाड, हदगाव तालुक्यातील कोळी येथील यादव चंपती पतंगे या ४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात आता किनवट व माहूर येथील दोन शेतकऱ्यांची भर पडल्याने गारपिटीचे ६जण बळी ठरले आहेत.