नक्षलवाद्यांना मदत करणाऱ्या गावांना दंड ठोठवा, ही मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी केलेली सूचना अजिबात व्यवहार्य ठरू शकत नाही, असे नक्षलवाद विरोधी मोहिमेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नक्षलवाद्यांचा लढा दीर्घकालीन असल्याने त्याला उत्तर देताना गावकऱ्यांना विश्वासात घेणे हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे मत अधिकाऱ्यांच्या वर्तुळात आता व्यक्त होत आहे. भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी व मुंबईचे आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी ‘इंडियन पोलीस जर्नल’मध्ये नक्षलवादी चळवळीच्या सद्यस्थितीवर एक लेख लिहून काही उपाय सुचवले आहेत. नक्षलवाद विरोधी मोहिमेत काम करणाऱ्या केंद्रीय तसेच राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्तुळात या लेखावर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. स्वत: सिंग यांनी ८० च्या दशकात गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. तेव्हा व आताच्या नक्षलवादी चळवळीत प्रचंड फरक पडला असून, आता ही चळवळ अधिक उग्र झाली आहे. या पाश्र्वभूमीवर सिंग यांनी या चळवळीच्या बिमोडासाठी सुचवलेले उपाय कार्यक्षेत्रात अंमलात आणणे शक्य नाही असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नक्षलवाद्यांना मदत करणाऱ्या गावांना दंड ठोठवा तसेच अशा गावांमध्ये दोन दिवसांची संचारबंदी लागू करा; तसेच गावातील सरपंच, पोलीस पाटील तसेच ज्येष्ठ नागरिकांना दंड करा अशी सूचना सिंग यांनी केली आहे.
या चळवळीचा प्रभाव असलेल्या भागातील गावकरी अनेकदा नाईलाजाने नक्षलवाद्यांना मदत करतात. बंदुकीच्या धाकामुळे हे घडते. या गावकऱ्यांनी नक्षलवाद्यांना विरोध करण्याची भूमिका घेतली तरी त्यांना पोलिसांकडून २४ तास संरक्षण दिले जाऊ शकत नाही. यामुळे मनात विरोध बाळगणाऱ्या गावकऱ्यांना सुद्धा नक्षलवाद्यांना जेवण, पाणी अशा गोष्टी द्याव्याच लागतात. प्रारंभीच्या काळात अशी मदत करणाऱ्या गावकऱ्यांवर मोठय़ा प्रमाणावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे या भागातील गावांमध्ये पोलिसांविरुद्ध असंतोष वाढला. त्याचा फायदा नक्षलवाद्यांनी उचलला याकडे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आज ‘लोकसत्ता’शी बोलताना लक्ष वेधले.
नक्षलवादी जाणीवपूर्वक कुरापती काढून गावकरी व पोलीस यांच्यात तेढ कशी निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करतात. अनेकदा चकमकीच्या वेळी गावकऱ्यांना समोर केले जाते. अशा स्थितीत पोलिसांनी पुन्हा जनतेला वेठीस धरण्याचे प्रकार केले तर ते नक्षलवाद्यांच्या पथ्यावर पडेल असे मत या अधिकाऱ्याने व्यक्त केले. सध्याच्या नक्षलवाद विरोधी मोहिमेत गावकऱ्यांवर कमीत कमी कारवाई करायची असेच धोरण केंद्रीय तसेच राज्याच्या सुरक्षा दलांनी आखलेले आहे. नक्षलवाद्यांनी सुरू केलेल्या या युद्धाची आखणी दीर्घकालीन आहे. त्याला पोलीस तसेच सुरक्षा दलांकडून देण्यात येणारे प्रत्युत्तर सुद्धा दीर्घकालीन स्वरूपाचेच असले पाहिजे. गावकऱ्यांना दंडीत करणे तसेच संचारबंदी लागू करणे हे तातडीचे उपाय ठरतात. यातून असंतोषाशिवाय काहीच साध्य होणार नाही असे मत या अधिकाऱ्याने व्यक्त केले.

मोहीम चुकीच्या दिशेने नको
डॉ. सत्यपाल सिंग हे ज्येष्ठ अधिकारी असल्याने त्यांनी सुचवलेले उपाय उघडपणे खोडून काढण्याची तयारी अधिकारी दाखवणार नाहीत. मात्र, नक्षलवाद विरोधी मोहीम चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाऊ नये असेही एका अधिकाऱ्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले.