रामटेकमध्ये काँग्रेसची जाहीर सभा

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवले म्हणून युवकांना मारहाण करण्यात आली.  राज्यातील ही दंडेली संपवण्यासाठी भाजपला सत्तेतून घालवा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले.

पूर्व विदर्भातील जनसंघर्ष यात्रेची पहिली जाहीर सभा रामटेक येथे गुरुवारी झाली. त्यात ते बोलत होते. व्यासपीठावर विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आशीष दुवा, आमदार सुनील केदार, माणिकराव ठाकरे, वसंतराव पुरके, अनंत घारड आदी उपस्थित होते.

मोदी सोलापूरध्ये आले तेव्हा काही युवकांनी त्यांना काळे  झेंडे  दाखवले. आरक्षण मिळाले नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत, बेरोजगारांना काम नाही म्हणून युवक संतापले होते. पण जनभावनांचा आदर न करता त्या युवकांना मारहाण करण्यात आली. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. राज्यात अशी दांडगाई चालू देणार नाही व त्याला घाबरणार नाही. सामान्य माणसांवरील अन्याय, अत्याचाराविरुद्ध काँग्रेस लढा  देईल, असे चव्हाण म्हणाले. काँग्रेसचे तीन राज्यात सरकार आल्याबरोबर कर्जमाफी करण्यात आली. कर्जमाफीची घोषणा झाली आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले. परंतु महाराष्ट्र सरकारने दोन वर्षांपूर्वी कर्जमाफी जाहीर करूनही कर्जमाफी झालेली नाही. हे असे होण्यामागचे कारण सरकारच्या तिजोरीत पैसा नाही. निव्वळ घोषणा तेवढय़ा दमदार केल्या जात आहेत. यांच्या घोषणांवर अजिबात विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले.