जिल्ह्य़ात अवैध वाळूउपसा करणाऱ्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच असून, शनिवारी भरदिवसा तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या अंगावर वाळूमाफियांनी ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान दाखविल्यामुळे कडवकर या घटनेतून बचावले.
पातोंडाच्या वाळूघाटात दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. येथील अवैध वाळूउपसा थांबविण्यासाठी कडवकर हे पथकासह गेले होते. विदर्भ व मराठवाडय़ातून वाहणाऱ्या पेनगंगा नदीच्या पातोंडा वाळूघाटाच्या पूर्वलिलावाची मुदत ३१ जुलैला संपली. नव्याने लिलाव प्रक्रियेची कार्यवाही सुरू आहे. पातोंडा वाळूघाटावर मोठय़ा प्रमाणावर अवैध वाळूउपसा होत असल्याची या भागातील शेतकऱ्यांची तक्रार होती. त्यामुळे व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कडवकर तेथे गेले होते. या वेळी अवैध वाळूउपसा करणारे ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला असता एका ट्रॅक्टरचालकाने त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. बाजूला उडी मारल्याने बचावलो, असे कडवकर यांनी सांगितले.  या घटनेनंतर सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. अन्य पाच ट्रॅक्टरचालक मात्र पळून गेले. बासंबा पोलीस ठाण्यात या प्रकरणी स्वत: कडवकर यांनीच फिर्याद दिली. त्यानुसार पळून गेलेल्या ट्रॅक्टरचालकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.  दरम्यान, ताब्यात घेतलेले दोन ट्रॅक्टर राजू विलास नागरे याचे असून वाळूच्या बाजारभावाच्या किमतीपेक्षा तीनपट दंड त्यांच्याकडून आकारण्यात येणार आहे, असे कडवकर यांनी स्पष्ट केले.