औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्डरचना आणि आरक्षण यांच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या तीन याचिका सोमवारी फेटाळण्यात आल्या. खंडपीठाच्या या निर्णयामुळे आता महापालिकेने पूर्वी जाहीर केलेल्या आरक्षण आणि वॉर्डांच्या हद्दीनुसारच निवडणुका होणार, हे स्पष्ट झाले आहे.
न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती व्ही. एन. जाधव यांच्या खंडपीठाने सोमवारी हा निकाल दिला. या विषयावर तीन दिवस प्रदीर्घ सुनावणी झाली होती. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्डरचना आणि आरक्षण यांच्या अनुषंगाने तीन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. न्यायालय या याचिकांवर काय निर्णय देते, याकडे औरंगाबादमधील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. न्यायालयाने याचिका फेटाळण्याचा निर्णय दिल्यामुळे पूर्वी जाहीर झालेल्या आरक्षणानुसारच निवडणुका होणार हे स्पष्ट झाले आहे.