इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) ही संस्था औरंगाबादमध्येच व्हावी, या साठी रविवारी व उद्या (सोमवारी) दोन दिवस २० संस्था-संघटनांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले. आयआयएमसाठी विविध पक्षीय नेतेही आता मैदानात उतरल्याने या प्रश्नाची धार अधिकच तीव्र झाली आहे. या पाश्र्वभूमीवर रविवारी आयआयएम मराठवाडा कृती समितीच्या वतीने थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र पाठवून यात लक्ष घालण्याचे साकडे घालण्यात आले.
यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्रात आयआयएम स्थापन करण्याची घोषणा केली. उद्योग, व्यापार, शैक्षणिक तथा सामाजिक संघटनांनी स्थापन केलेल्या आयआयएम मराठवाडा कृती समितीने मांडलेल्या बाबींचा अभ्यास करून आयआयएम मराठवाडय़ातच का व्हावे, याचे उत्तर शोधावे अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. कृती समितीचे समन्वयक मुनीष शर्मा यांनी हे निवेदन पाठविले आहे.
डीएमआयसीतर्फे औरंगाबाद शेंद्रा-बिडकीन येथे देशातील सात मोठय़ा व महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत निर्माण होत आहे. येथे मोठय़ा संख्येने आंतरराष्ट्रीय कंपन्या आपले कारखाने सुरू करतील, अशी योजना आहे. तसेच डीएमआयसी धुळे व सिन्नर औरंगाबादपासून दीडशे किलोमीटर अंतरावर आहे. अंदाजे याच अंतरावर नाशिक, अहमदनगर, जळगाव औद्योगिक वसाहती आहेत. आयआयएमची उद्योगांसाठीची उपयुक्तता लक्षात घेता औरंगाबादसारख्या मध्यवर्ती व काही काळात महाऔद्योगिक वसाहत होण्याची क्षमता असलेल्या विभागाला ही संस्था मिळणे संयुक्तिक आहे.
अर्थसंकल्पातील घोषणेनंतर लगेचच औरंगाबादस्थित उद्योग, व्यापार व व्यावसायिक जगताने चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या (सीएमआयए) नेतृत्वाखाली आयआयएम मागणीची मोहीम हाती घेतली. यावरच न थांबता येथील उद्योग जगताने या प्रकल्पात सहभागी होण्याचीही तयारी दर्शविली. प्रत्येक विभाग आयआयएमसाठी प्रयत्न करीत आहे. आयआयएमसाठी औरंगाबाद शहर कसे योग्य ठरणारे आहे, याची कारणेही निवेदनात नमूद केली आहेत.