सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीचा मोठा फटका सोलापूर जिल्ह्यात शरद पवार यांना बसल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात फेर जुळवणी सुरू केली आहे. एकीकडे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील हे पुन्हा पवार यांच्या सोबत गेले असताना दुसरीकडे मोहोळसारख्या भागात वजनदार नेते राजन पाटील-अनगरकर हे राष्ट्रवादी पवार गटात गेल्यामुळे तेथील पोकळी भरून काढण्यासाठी भाजपचे स्थानिक नेते संजय क्षीरसागर यांना जवळ केले आहे. अशीच स्थिती माढा, करमाळा आदी भागातही निर्माण होताना दिसून येते.

मोहोळ तालुक्यात दिवंगत ज्येष्ठ नेते बाबूराव पाटील-अनगरकर यांचा मोठा दरारा होता. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र राजन पाटील हे स्वतःची ताकद टिकवून आहेत. १९९५ ते १९९९ पर्यंत आमदारकी शाबूत ठेवल्यानंतर पुढे मतदारसंघाच्या पुनर्चरनेत मोहोळ विधानसभा मतदारसंघ राखीव झाला असता २००९, २०१४ आणि २०१९ अशा तीन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीतर्फे अनुक्रमे प्रा. लक्ष्मण ढोबळे, रमेश कदम आणि यशवंत माने हे तीन आमदार निवडून आणण्यात राजन पाटील हे यशस्वी झाले आहेत. स्वतःच्या नक्षत्र वाईन्स कारखान्याकडून सुमारे शंभर कोटींचा अबकारी कर चुकविल्याप्रकरणी पाटील कुटुंबीयांवर यापूर्वी गुन्हा दाखल झाला होता. या पार्श्वभूमीवर राजन पाटील हे मध्यंतरी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. मात्र भाजपऐवजी ते राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले. सध्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत पाटील कुटुंबीय महायुतीचा प्रचार करीत आहेत.

Sharad Pawar press conference _ 4
“त्यांची फाईल आज टेबलवरून कपाटात, पण उद्या…”, भाजपाबरोबर गेलेल्या नेत्यांना शरद पवारांचा इशारा
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Varsha Gaikawad Congress
उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर; भाजपाकडून पूनम महाजन यांच्याबाबत मौन
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Shahu Maharaj Asaduddin Owaisi
मोठी बातमी : कोल्हापुरात शाहू महाराजांची ताकद वाढली, एमआयएमचा पाठिंबा; इम्तियाज जलील म्हणाले, “मी ओवैसींना…”
ajit pawar sharad pawar (4)
“२०१४ च्या निवडणुकीचा निकाल यायच्या आधीच…”, अजित पवारांची शरद पवारांवर टीका; म्हणाले “मी पहाटे पाच वाजता…”
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती

राजन पाटील यांच्या पश्चात राष्ट्रवादी शरद पवार गटात मोहोळ तालुक्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी शरद पवार हे मोहरे शोधण्याचा प्रयत्न करीत असताना भाजपचे स्थानिक नेते संजय क्षीरसागर हे पवार यांच्या हाती लागले आहेत. त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश मोहोळ येथे स्वतः पवार यांच्या उपस्थितीत झाला.

हेही वाचा >>> सोलापुरात काँग्रेस व भाजपचा प्रचार शिगेला 

यापूर्वी भाजपमध्ये असताना धनगर-खाटिक समाजाचे संजय क्षीरसागर व त्यांचे बंधू नागनाथ क्षीरसागर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजन पाटील यांना २६ वर्षे कडवी झुंज दिली होती. मागील २०१९ साली मोहोळ विधानसभा निवडणुकीत संजय क्षीरसागर यांचे बंधू नागनाथ क्षीरसागर यांनी ६८ हजार ८३३ मते मिळाली होती. तत्पूर्वी, २०१४ साली संजय क्षीरसागर यांनीही भाजप कमकुवत असताना स्वतःच्या ताकदीवर  विधानसभा लढतीत ५३ हजार ७५३ मते मिळविली होती. भाजपने महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सामील करून घेतल्यानंतर भाजपचे वर्षानुवर्षे काम करणारे बहुसंख्य ताकदवान आणि निष्ठावंत नेते पक्ष सोडून जात आहेत.

यंदाच्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना माळशिरसमध्ये उत्तम जानकर, करमाळ्यातील माजी आमदार नारायण पाटील आणि माढा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे हे अनुक्रमे राष्ट्रवादी अजित  पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि भाजप सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटाशी घरोबा केला आहे. माढा लोकसभेसाठी माढा तालुक्यातील मोडनिंब आणि सोलापूर लोकसभेसाठी मोहोळ येथे शरद पवार यांच्या प्रचारसभा झाल्या. तापमानाचा पारा ४२ अंशावर असताना दुपारच्या रखरखत्या उन्हात झालेल्या दोन्ही सभांमध्ये पवार यांना १५ मिनिटांत भाषणे आटोपती घ्यावी लागली. यातच मोहोळ येथे एका मंगल कार्यालयात झालेल्या सभेत एक हजाराचा जनसमुदाय होता. त्यातच व्यासपीठावर गर्दी होऊन नियोजन ढेपाळले. त्यामुळे पवार यांच्या भाषणाला अपेक्षित धार चढली नव्हती. मात्र यावेळी भाजप सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करताना संजय क्षीरसागर यांच्या भावना दाटून आल्या होत्या. डोळ्यात पाणी आणून त्यांनी भाजपवर जोरदार टीका करीत त्या पक्षाची साथ सोडली.