सीएसआरडीचे संस्थापक संचालक डॉ. एच. बी. हळबे यांचा चरित्रग्रंथ समाजशास्त्राचे विद्यार्थी व युवा पिढीला प्रेरणादायी ठरेल असा विश्वास स्नेहालयचे अध्यक्ष सुवालाल शिंगवी यांनी व्यक्त केला.
हळबे यांची कन्या जयश्री रघुराम यांनी लिहिलेल्या हळबे यांच्या ‘लाइफ बायचान्स’ या चरित्रग्रंथाचा प्रा. एन. बी. मिसाळ यांनी ‘जीवन- एक योगायोग’ या नावाने मराठी अनुवाद केला आहे. त्याचे प्रकाशन नुकतेच शिंगवी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे होते. आयएमएसचे सरसंचालक डॉ. एस. बी. कोलते, ज्येष्ठ नेते बन्सीभाऊ म्हस्के, आशा मॅसे, जयश्री रघुराम, विजय हळबे, स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, उद्योजक श्रीगोपाल धूत आदी यावेळी उपस्थित होते.
शिंगवी म्हणाले, डॉ. हळबे यांचा मूळ पिंड समाजसेवकाचाच होता. त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या समवेत काम केले. समाजकारणातील मूळ तत्वे व मूल्ये जोपासत त्यांनी समाजकारणाला शैक्षणिक आयाम दिला असे गौरवोद्गार शिंगवी यांनी काढले.
डॉ. पठारे यांनी यावेळी बोलताना डॉ. हळबे यांच्या कार्याची माहिती दिली. समाजकारणाविषयी असलेली आस्था आणि दूरदृष्टी याच्या जोरावरच त्यांनी सीएसआरडीची स्थापना केली. तेवढय़ावर ते थांबले नाही तर, संस्थेला आणि या अभ्यासक्रमाला त्यांनी राज्यात वेगळा दर्जा प्राप्त करून दिला. आपल्या पीएचडी संशोधनातही त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले असे ते म्हणाले.
डॉ. कोलते, जयश्री रघुराम, मिसाळ यांचीही यावेळी भाषणे झाली.