मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ जिंकण्याचा निर्धार भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असला तरी १९७७चा अपवाद वगळता या मतदारसंघात काँग्रेस किंवा शरद पवार यांचाच आतापर्यंत प्रभाव राहिला आहे.

बारामती मतदारसंघ १९५७ मध्ये अस्तित्वात आला. तेव्हापासून नेहमीच काँग्रेसचे या मतदारसंघावर वर्चस्व राहिले. आणीबाणीनंतर १९७७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय लोकदलाच्या वतीने संभाजीराव काकडे हे विजयी झाले होते. तेव्हा काकडे यांनी काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय मंत्री विठ्ठलराव गाडगीळ यांचा पराभव केला होता. काकडे आणि गाडगीळ हे दोघेही पवारांचे राजकीय विरोधक होते. पु. ल. देशपांडे यांची आणीबाणीच्या विरोधात झालेली बारामतीमधील सभा तेव्हा निर्णायक ठरली होती. काकडे हे ३१ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. १९८४च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार हे समाजवादी काँग्रेसच्या वतीने निवडून आले होते. पुढे त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन राज्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय घेतला होता. १९८५ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत पवारांनी पाठिंबा दिलेले जनता पक्षाचे संभाजीराव काकडे विजयी झाले होते. पवार आणि काकडे हे पारंपरिक विरोधक होते, पण त्या निवडणुकीत पवारांनी काकडे यांना पाठिंबा दिला होता, असे जनता पक्षाचे मतदारसंघाचे तत्कालीन संघटक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सांगितले.

या मतदारंसघाचे १९५७ मध्ये केशवराव जेधे, १९६० पोटनिवडणूक आणि १९६२ मध्ये गुलाबराव जेधे, १९६७ मध्ये तुळशीदास जाधव, १९७१ मध्ये माजी मंत्री केशवराव खाडिलकर, १९७७ आणि १९८५ पोटनिवडणूक संभाजीराव काकडे, १९८० शंकरराव पाटील, १९८४ शरद पवार, १९८९ शंकरराव पाटील, १९९१ अजित पवार, १९९१ पोटनिवडणूक, १९९६, १९९८, १९९९, २००४ शरद पवार निवडून आले आहेत. २००९ आणि २०१४ मध्ये सुप्रिया सुळे हे विजयी झाले होते. संभाजीराव काकडे हे बिगर काँग्रेस पक्षाचे नेते विजयी झाले होते. हा अपवाद वगळता काँग्रेस किंवा पवारांचा वरचष्मा या मतदारसंघावर राहिला आहे.

सुप्रियाताईंचे मताधिक्य घटले

२००९च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे या जवळपास साडेतीन लाखांच्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. पण २०१४च्या निवडणुकीत सुप्रियाताईंचे मताधिक्य घटून ते फक्त ७० हजार होते. राष्ट्रवादीसाठी हा सूचक इशारा होता. या निवडणुकीत जास्तीत जास्त मताधिक्याने जिंकण्याचा निर्धार राष्ट्रवादीने केला आहे.

अमित शहा किंवा फडणवीस यांनी बारामती जिंकण्याचा निश्चय केला असला तरी हे आव्हान सोपे नाही. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे संघटन मजबूत आहे. या तुलनेत भाजपची ताकद कमी आहे. भाजपने बारामती जिंकण्याचा निर्धार केल्याने राष्ट्रवादीचे नेते हा मतदारसंघ आता प्रतिष्ठेचा करण्याची शक्यता आहे.