पाऊस गायब झाल्याने खरिपाची आशा संपुष्टात

हवामान खात्याचा अंदाज नेहमीप्रमाणे याही वर्षी चुकला असून मृगाच्या पहिल्या चरणात हजेरी लावणारा पाऊस गेले १५ दिवस गायब झाल्याने खरिपाची आशा संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. यातच शनिवारी साजऱ्या झालेल्या बेंदराच्या सणाकडे बळीराजाने पाठ फिरवून आपली नाराजी प्रदíशत केली.

आषाढ पौर्णिमेला साजरा केला जाणारा बेंदूर जिल्ह्यात केवळ औपचारिकता म्हणून साजरा करण्यात आला. या सणाच्या वेळी गावच्या ओढय़ाला दिवसातून दोनदा पूर येण्याची परंपरा यंदा खंडित झाली असून शनिवारी ढगाळ हवामान असतानाही उन्हाचे चटकेही बसू लागल्याने माळरान व हलक्या रानातील पिके जळू लागली आहेत.

जिल्ह्यात खरीप पिकाखालील क्षेत्र २ लाख ९१ हजार ९०८ हेक्टर असून प्रारंभीच्या काळात झालेल्या पावसावर १ लाख २९ हजार ९०५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून ही एकूण क्षेत्राच्या ४४ टक्के आहे. यात शिराळा तालुक्यातील डोंगराळ भागाचा समावेश अधिक असून जत, आटपाडी, खानापूरचा घाटमाथा आदी भागात प्रथमच खरीप हंगामातील कडधान्याची पेरणी करण्यात आली आहे. मात्र गेले दहा दिवसांहून अधिक काळ पावसाने ओढ दिल्याने माळरानाबरोबरच हलक्या रानातील खरिपाची पिके जळू लागली असून माना टाकत आहेत.  दुबार पेरणीचे संकट आ वासून उभे राहिल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून पुन्हा पेरणीसाठी जुळणी करणे आवाक्याच्याबाहेर राहणार आहे. तसेच कडधान्याची पेरणी आता पुढील नक्षत्रात करायची म्हटले तरी साधणार नाही. अशा दुहेरी संकटात सापडले आहेत.

अशातच बळीराजाचा जिवाभावाचा सखा असलेल्या बलांचा सण बेंदूर आज साजरा करण्यात आला. मात्र पावसाने डोळे वटारल्याने बेंदराच्या सणातील उत्साहच संपला असून अनेक गावात बलांच्या मिरवणुका काढण्यात आल्या नाहीत. मात्र या निमित्ताने बलांसह जनावरांना अंघोळ मात्र घालण्यात आली. नदीकाठाला बलांसह अन्य जनावरांना धुण्यासाठी गर्दी करण्यात आली होती. बलांना रंगविण्यात आले नसले तरी पुरण-पोळीचा नवद्य मात्र चारण्यात आला.