छगन भुजबळ शेळीसारखा कधीही जगणार नाही, जगेल तो वाघासारखाच असा  इशारा देतानाच माझ्या छातीत सहा महिने कळ आली नाही असं काही ट्रोलींग सुरु आहे. मी म्हणतो माझ्या छातीत कळ आली नाही परंतु माझ्या भाषणाने तुमच्या छातीत कळा का यायला लागल्या आहेत, अशा शब्दात ट्रोलींगच्या बातम्यांचा समाचार आपल्या खास शैलीत आमदार छगन भुजबळ यांनी नाशिकमधील घोटी येथील जाहीर सभेत घेतला.

आता यापुढे छगन भुजबळ नावाचे वादळ घोंघावणार हे आता त्यांच्या भाषणातील करारीपणाने स्पष्ट झाले आहे. ओबीसींच्या मतांसाठी भाजप सरकार ७०० कोटींचा निधी जाहीर करतंय… अरे घरी बसण्याची तुमची वेळ आली आहे मग ७०० कोटी रुपये देणार कुठुन असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी सिन्नर येथील जाहीर सभेत केला.

ओबीसींचे आरक्षण रद्द करण्यासाठी कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ओबीसींचे आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न यांचा आहे. अहो ९ न्यायाधीशांच्या खंडपीठाने ओबीसींचे आरक्षण दिले आहे असे सांगतानाच आज ओबीसींचे १७ टक्के आरक्षण राहिले आहे. तर ९ टक्केच नोकर्‍यांमध्ये आरक्षण भरलेले आहे अशी माहितीही आमदार छगन भुजबळ यांनी दिली.

सवर्णांना १० टक्के आरक्षण जाहीर केले आहे. परंतु हे आरक्षण कोर्टात टिकेल की नाही याबाबत शंका आहे. यांना साडेचार वर्षांत सूचलं नाही. परंतु पाच राज्यात फटका बसल्यावर ज्याला पाहिजे ते द्यायला हे सरकार तयार झाले आहे अशी टीकाही छगन भुजबळ यांनी केली.

राज्य करण्याची यांची लायकी नाही. यांची लवकरच घर वापसी करा असे आवाहनही आमदार छगन भुजबळ यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा आजचा सहावा दिवस असून परिवर्तन यात्रेच्या दुसर्‍या टप्प्याची सुरुवात आजपासून नाशिक जिल्हयातून झाली. घोटी येथील दुसरी सभाही प्रचंड गर्दीमध्ये पार पडली.