सर्वांचा लाडका गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सव जवळ आला असला तरी त्यावर करोनाचं संकट असल्यानं अनेकांनी अगदी साधेपणानं तो साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी अनेक चाकरमानी कोकणाच्या दिशेने जात असतात. परंतु आता त्यांना ७ ऑगस्टपूर्वीच आपलं गाव गाठावं लागणार आहे. सिंधुदुर्गात पार पडलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठतीच तसा प्रस्ताव सादर करून तो राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावरून आता भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या प्रस्तावावरून शेलार यांनी सरकारला काही सवाल केले आहेत. “लालबागच्या राजाची आणि भक्तांची ताटातूट करु नका. तसंच कोकणातील चाकरमान्यांची आणि बाप्पाची भेट कशी होणार? याची आम्ही सरकारकडे विचारणा केली होती. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना पुढे करुन चाकरमान्यांची कोंडी करण्याचा प्लॅन तयार केला आहे का? परस्पर घोषणा केली का? सरकारला हे मान्य आहे का?,” असे सवाल त्यांनी केले आहेत. त्यांनी ट्विटरवरून सरकारला याबाबत प्रश्न केले आहेत.

आणखी वाचा- गणेशोत्सवात सिंधुदुर्गमध्ये प्रवेशबंदीचे संकेत

७ ऑगस्ट रात्री १२ वाजेपर्यं सिंधुदुर्गात प्रवेश घेता येणार असल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान, ते आयोजित बैठकीतलं वृत्त असल्याचं समोर आलं होतं. तसंच त्यानंतर जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनीदेखील तो आदेश नसल्याचं स्पष्ट केलं होतं. परंतु या व्हायरल मेसेजमुळे गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

लालबागच्या राजाच्या ‘आरोग्योत्सव’

नवसाला पावणारा म्हणून जगभरामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या लालबागच्या राजाला ८६ वर्षांची पंरपरा आहे. मागील ८६ वर्षांपासून लालबागमधील मार्केटमध्ये राजाची मूर्ती विराजमान होते. अनेक वर्षांपासून राजाची १४ फुट उंचीच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आवर्जून येतात. मात्र यंदा करोनामुळे उत्सवाऐवजी रक्तदान शिबिरं आणि प्लाझ्मा थेरपी शिबिरं राबवण्यात येणार आहेत. दरवर्षी लालबागच्या राजाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा मात्र अगदी साध्यापद्धतीने आणि समाजभान राखत मंडळाने उत्सव साजरा न करण्याला प्राधान्य दिलं आहे.