News Flash

“पवारसाहेब आज मला तुमची खूप आठवण येतेय”

चित्रा वाघ यांनी सांगितली २०१६ मधील आठवण

भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावर बोलताना चित्रा वाघ यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची आठवण झाली. पत्रकार परिषदेत त्यांनी शरद पवारांसोबतची आठवण सांगत “माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याची बातमी समजली, तेव्हापासून मला शरद पवार साहेबांची खूप आठवण येत आहे,” चित्रा वाघ म्हणाल्या.

चित्रा वाघ यांची आज नाशिक येथे पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत वाघ यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरून संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच प्रकरणाशी संबंधित घडामोडींचा दाखला देत राज्य सरकार व पोलिसांकडे जवाब मागितला. यावेळी त्यांना पती किशोर वाघ यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या,”पूजा चव्हाण प्रकरणावरून महाविकासआघाडी सरकारवर टीका केल्यानं आणि मी सातत्याने आवाज उठवत असल्यामुळेच माझे पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशी करायची होती, तेव्हा एसीबीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या पतीला घरी येऊन नोटीस दिली. पण आता त्यांच्यावर गुन्हा दाखल केला तर एसीबीला त्यांना कळवावेसे वाटले नाही का? एसीबीकडे माणसे उरली नाहीत का?,” असा सवाल वाघ यांनी केला.

पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, “लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल केल्याची बातमी समजली, तेव्हापासून मला शरद पवार साहेबांची खूप आठवण येत आहे. मला आजही आठवते की, ५ जुलै २०१६ रोजी माझ्या पतीवर आरोप झाले. त्यानंतर ७ जुलैला ईदच्या दिवशी मी शरद पवार यांना भेटायला गेले. त्यावेळी शरद पवार यांनी माझ्याकडे एफआयआरची प्रत मागितली. ती प्रत नीट वाचल्यानंतर ‘तुझा नवरा या सगळ्यात कुठेच नाही’, असं शरद पवार यांनी मला सांगितले. त्यामुळेच आज सकाळपासून मला शरद पवार साहेबांची खूप आठवण येत आहे,” असं चित्रा वाघ यांनी सांगितलं.

“मी एकटी पुरून उरेन”

“ही लाच घेतल्याचं प्रकरण जेव्हा घडलं, तेव्हा माझे पती किशोर वाघ हे घटनास्थळापासून पाच किलोमीटरच्या परिसरातही नव्हते. याप्रकरणात मुख्य आरोपी असलेले गांधी रुग्णालयाचे तत्कालीन महानिरीक्षक गजानन भगत यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यांची अजून चौकशीच सुरु आहे. २०११ पासून एसीबीच्या अनेक केसेस पेंडिंग आहेत. पण आता माझ्या नवऱ्यावरच गुन्हा दाखल कसा करण्यात आला? एसीबीने ज्याप्रकारने तातडीने गुन्हा दाखल केला त्यासाठी मी गृहमंत्र्यांना तीनदा सॅल्यूट ठोकते. पूजा चव्हाण प्रकरणात आवाज उठवत असल्यामुळे माझ्या पतीला अटक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्यावर रोज दबाव आणला जातोय. त्यांना टॉर्चर केलं जात आहे. पण मला न्यायव्यस्थेवर विश्वास आहे. ती सरकारसारखी मुर्दाड नाही. मी या सरकारला एकटी पुरून उरेन. मी तुमच्यासोबत २० वर्षे काम केलं आहे, हे विसरु नका,” असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2021 3:23 pm

Web Title: bjp leader chitra wagh reaction acb compliant against her husband kishor wagh sharad pawar bmh 90
Next Stories
1 “संशयित आरोपी असलेल्या मंत्र्याला अभय द्यायचं? की पूजा चव्हाणला न्याय, हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावं”
2 “स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी”
3 पूजा चव्हाण प्रकरण : ‘शरद पवार, जागे व्हा’ अशा घोषणा देत भाजपाकडून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग अडवण्याचा प्रयत्न
Just Now!
X