पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी तपोवन परिसरात कुठेही ५० ते ६० झाडांची तोड झालेली नाही. केवळ सात झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. एकही संपूर्ण झाड तोडण्यात आलेले नाही, या महापालिका व भरारी पथकाच्या अहवालावरून पंतप्रधानांच्या सभेसाठी झाडांची तोड तसेच शाही सुविधा पुरवून आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी दाखल झालेला अर्ज निकाली काढण्यात आला. झाडांच्या फांद्या तोडल्यावरून जागा मालकास स्वतंत्रपणे नोटीस दिली जाणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे. भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ तपोवन परिसरातील खासगी जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या सभेसाठी मैदानावरील ५० ते ६० झाडांची तोड करण्यात आल्याची तक्रार राष्ट्रवादीचे पदाधिकारी नंदन भास्करे यांनी केली होती. झाडांची तोड व शाही सुविधा पुरवून आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पालिकेचे विभागीय अधिकारी व नाशिक पूर्व मतदारसंघातील भरारी पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सभा मंडपाच्या मागील बाजूस चार कडुलिंब, २ कोट, १ काटेरी बाभूळ अशा सात झाडांचा विस्तार कमी करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याचे पालिकेने म्हटले आहे. वृक्षतोड कुठेही झालेली दिसून आली नाही. झाडांच्या फांद्या कोणी तोडल्या याची स्पष्टता झालेली नाही. ही खासगी जागा असल्याने मालकाचा शोध घेऊन त्यास नोटीस बजावून विचारणा केली जाईल. त्यानंतर कारवाई करता येईल, असा अहवाल पालिकेने दिला आहे. नाशिक पूर्वमधील भरारी पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला. रखवालदाराचा जबाब नोंदवून आपला अहवाल सादर केला. त्यात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या झाडांच्या फांद्या कापण्यात आल्याचे म्हटले आहे. पण कुठेही मुळापासून झाड तोडण्यात आलेले नाही. या अहवालांचा संदर्भ घेऊन निवडणूक शाखेने भास्करे यांचा तक्रार अर्ज निकाली काढला.