अत्याचारपीडित महिलेस सरकारकडून मिळणाऱ्या दोन लाख रुपयांच्या अनुदानाचा धनादेश देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना विनोद राजेंद्र भोसले या अधिकाऱ्यास लाचलुचपत विभागाने गुरुवारी रंगेहाथ पकडले.
पीडितेला सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाबाबत पत्राद्वारे माहिती मिळाल्यानंतर ‘तिच्या’ पतीने बुधवारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात जाऊन चौकशी केली. तेथे त्यांना भोसले याला भेटण्यास सांगण्यात आले. त्यांनी भोसले याला भेटून पत्नीच्या नावे आलेले पत्र दाखविले. भोसले याने त्यांना कार्यालयाबाहेर नेऊन, तुझ्या पत्नीवर बलात्कार झाल्यामुळे सरकार तुझ्या पत्नीला दोन लाख अनुदान देणार आहे. त्याचा धनादेश देण्यासाठी कागदपत्र तयार करण्याचे काम माझ्याकडे आहे. त्यासाठी ५० हजार रुपये दे, असे सुनावले. मात्र, गरिबीमुळे एवढी रक्कम देऊ शकत नाही, असे सांगितल्यावर उद्या २५ हजार दे व धनादेश घेऊन जाताना २५ हजार दे, असे त्याने सांगितले. यानंतर पीडितेचा पती निघून गेला. त्यास रात्री साडेनऊ वाजता मोबाईलवर संपर्क करून भोसलेने पशाची व्यवस्था झाली का, याची चौकशी केली व सकाळी कार्यालयात येऊन २५ हजार दे, धनादेशाचे काम लवकर करतो, असे सांगितले.
गुरुवारी सकाळी पीडितेच्या पतीने लाचलुचपतचे कार्यालय गाठून तक्रार नोंदविली. त्यानंतर विभागाच्या पथकाने कार्यालयात सापळा लावून भोसले यास २० हजार रुपयांची लाच घेताना पकडले.