जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर केंद्रीय कृषी विधेयकांची होळी करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कृषी विधेयक शेतकरी विरोधी असून यातून उद्योजकांना खूश करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

केंद्र सरकारने रविवारी संसदेत दोन कृषी विधेयक संमत केले. या विधेयकाविरोधात राज्यसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला होता. गोंधळ घालणा?ऱ्या खासदारांवर कारवाई करण्यात आल्याने संतप्त झालेल्या काँग्रेसने सोमवारी कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी देशभरात आंदोलने केली. धुळ्यातही बाजार समितीसमोर युवक काँग्रसेच्या वतीने विधेयकाची होळी करण्यात आली. कृषी विधेयक हे शेतकरी विरोधी असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान आणि मोठय़ा उद्योजकांना फायदा होणार आहे. मोठय़ा उद्योजकांना फायदा पोहोचविण्यासाठीच केंद्र सरकारने हे शेतकरी विरोधी विधेयक संमत केल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.

आंदोलनात युवक काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्राच्या प्रभारी प्रियंका सानप, प्रदेश सचिव राजीव पाटील, जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, जिल्हा परिषद सदस्य धीरज अहिरे, पंकज चव्हाण आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.