राज्यातील दिव्यांगाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी राज्य सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून दिव्यांगांसाठी राज्यातील पहिल्या आयटीआयच्या प्रस्तावाला सोमवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या पुढाकारातून राज्यातील पहिले दिव्यांगाचे आयटीआय उभारले जात आहे.

दिव्यांगाना स्वतःच्या पायावर उभं करून त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी राज्य सरकार ठोस पावलं उचलत आहे. त्या अनुषंगाने सर्व विभागांना दिव्यांगाच्या विकासासाठी पाच टक्के निधी खर्च करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यातील दिव्यांगाची नोंद ग्रामपंचायत स्तरावर करण्यात येत असून त्यांना विविध सोयी सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. लातूर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीची नोंद करण्यात आली असून अशी नोंद करणारा लातूर हा राज्यातील पहिला जिल्हा आहे. त्याचबरोबर दिव्यांगासाठी सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा व विविध साहित्य उपकरणे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

राज्यातील हे दिव्यांगाचे पहिले आयटीआय असणार आहे.यासाठी आवश्यक असणारा निधीही मंजुर झाला आहे. या दिव्यांगाच्या आयटीआयमुळे दिव्यांगाना कौशल्यावर आधारीत प्रशिक्षण मिळून ते मुख्य प्रवाहात येणार आहेत.