सागरी सुरक्षेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस चेक पोस्टच्या सक्षमीकरणाची मोहीम रायगड पोलिसांनी हाती घेतली आहे. पोलीस चेक पोस्टवरील सुरक्षा व्यवस्थेला भक्कम करण्यासाठी आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून रेवदंडा पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येणाऱ्या साळाव येथील चेक पोस्टवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
अजमल कसाबने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवरील सागरी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर नऊ नव्या सागरी पोलीस ठाण्यांची उभारणी करण्यात आली. पोलीस दलाला अत्याधुनिक स्पीड बोटीही पुरवण्यात आल्या. समुद्रालगत असणाऱ्या रस्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस चेक पोस्ट उभारणी करण्यात आली, पण मनुष्यबळाला आधुनिक तंत्रज्ञानाची मदत लाभली तर सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम ठरू शकते, ही बाब लक्षात घेऊन पोलीस चेक पोस्टवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय रेवदंडा पोलीस दलाने घेतला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाच्या निधीची वाट न पाहता लोकसहभागातून सीसीटीव्ही य्ांत्रणा कार्यान्वित करण्यात आली. आता अलिबाग, मुरुड आणि रोहा या तीनही ठिकाणांहून येणाऱ्या रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. त्यामुळे तीनही रस्त्यांवर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनांवर या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. रात्रीच्या वेळीही कॅमेऱ्यांचे काम सुरळीत सुरू राहावे यासाठी हायमास्क दिवे उभारण्यात आले आहेत. रेवदंडा पोलिसांच्या या स्तुत्य उपक्रमाचे अनुकरण कोकणातील इतर पोलीस चेक पोस्टनी करणे गरजेचे आहे.
पोलीस दलाच्या दृष्टीने साळाव चेक पोस्ट हे महत्त्वाचे ठिकाण आहे. कारण तीन तालुक्यांतील रस्ते या ठिकाणी येत असतात. मानवी सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी राहू शकतात. अशा वेळी सीसीटीव्ही तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती रेवदंडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी दिली.