चंद्रपुरमधील सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या व्याहाड खुर्द उपवनातील बीट शिर्शी नियतक्षेत्र 1534 साखरी माल येथे, काल रानडुक्कराची शिकार करण्यासाठी  लावलेल्या जाळीत अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही माहिती वनपरिक्षेत्राला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी धाडे  हे विभागीय अधिकारी सोनकुसरे यांना  याबाबत कळवून घटनास्थळी वन कर्मचाऱ्यांचे पथक घेऊन दाखल झाले होते.   बिबट्याचा मृत्यू झाला असल्याने आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे फिरवून, नेमकं जाळे कशासाठी लावण्यात आले याची चौकशी करून 19 आरोपींना अटक करण्यात आली.

या आरोपींमध्ये भोजराज ठाकुर, सुखदेव बांबोळे, आकाश कुमरे, नरेंद्र भोयर, सावजी उराडे, श्रीधर गेडाम, दवरथ गेडाम, विवेक आवळे, ठाकुर, रमेश भोयर, राजू भोयर, प्रमोद भोयर,देवराव बांबोळे ,सत्यवान गेडाम सर्व रा.शिर्शी तर तुळशीराम भोयर, भाऊजी भोयर, किशोर भोयर, पुरुषोत्तम सोयाम आदी रा.पेठगाव यांच्या समावेश आहे. या सर्वांवर वन्यजीव अधिनियम कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली .

ही कारवाई विभागीय वनाधिकारी सोनकुसरे, वनपरिक्षेत्र अधिकारी धाडे , उमेशसिंग झिरे यांच्या मार्गदर्शात पार पडली.  या संपूर्ण कारवाईमध्ये व्याहाड क्षेत्र सहायक बुरांडे, सावली क्षेत्र सहायकव्ही.सी.धुर्वे , पेंढरी क्षेत्र सहायक भोयर तसेच वनरक्षक गेडाम, चौधरी, नागरगोजे,  नागरे, पाडवी आदींनी सहकार्य केले.

सहा महिन्यांपूर्वी कापसी वाघ शिकार प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली होती.  आता नियत क्षेत्र साखरी मालमध्ये जाळे लावण्यात आले त्यात बिबट्याच्या मृत्यूने वनविभागात खळबळ उडाली आहे.  नेहमीच या क्षेत्रात शिकार केली जाते की शेताच्या होणा-या नुकसानासाठी जाळी लावण्यात येते हा प्रश्न अंधातरी असतानाच  बिबट्याचा मात्र मृत्यू झाला आहे.

या प्रकाराची गंभीर दखल घेत वनविभागाने बिबट्याच्या शिकारप्रकरणी तपास चक्रे गतिमान करुन आरोपींना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे या भागात वन्यप्राण्यांचा वावर असून, या ठिकाणी नेहेमीच वन्यप्राणी आणि माणसात संघर्ष होताना दिसतो. यामध्ये कधी वन्यजीवांना तर कधी मनुष्याला आपला जीव गमवावा लागतो. यामध्ये वन्य जीवांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे.