News Flash

चंद्रपूर : तळोधी बाळापूर परिसरात तीन ग्रामस्थांचा बळी घेणारा वाघ अखेर जेरबंद

ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा श्वास

छायाचित्र प्रातिनिधीक आहे

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनविभागाअंतर्गत येणाऱ्या नागभीड तालुक्यातील तळोधी बाळापूर परिसरात धुमाकूळ घालून तीन ग्रामस्थांचा बळी घेणाऱ्या टी १ वाघाला वन विभागाच्या पथकाने आज रविवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास जेरबंद केले. दरम्यान, वाघ जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला. चार दिवसात ब्रम्हपुरी परिसरात दोन वाघ जेरबंद करण्यात आले आहेत.

तळोधी बाळापूर परिसरात या वाघाने गेल्या काही दिवसात चांगलाच धुमाकूळ घातला होता. शनिवारी सायंकाळी जगदीश फागो मोहुर्ले (वय ४०) या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला असता त्यांचा जागीच मृत्यू झाला. तत्पूर्वी दोन ग्रामस्थांना या वाघाने अशाच प्रकारे लक्ष्य केले होते.

दरम्यान, ग्रामस्थांनी वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली होती. वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आज सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक कुलराजसिंग यांच्या नेतृत्वाखाली वनाधिकारी घटनास्थळी पोहचले. तिथे ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांना पाचारण करण्यात आले.

त्यानंतर ठराविक ठिकाणी जाळी लावून वाघाला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू झाले. बऱ्याच प्रयत्नांनंतर अजय मराठे यांनी वाघाला भूलीचे इंजेक्शन टोचले दिले. त्यानंतर वाघ बेशुद्ध झाला आणि त्यानंतर त्याला जेरबंद केले गेले. जेरबंद वाघ अडीच ते तीन वर्षांचा असून त्याचे आरोग्य देखील चांगले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 10:33 pm

Web Title: chandrapur a tiger that killed three villagers in talodhi balapur area has finally been arrested aau 85
Next Stories
1 अकोल्यात करोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; ४७ नवे रुग्ण
2 दहावी, बारावीचा अभ्यासक्रम तातडीने कमी करा
3 सोलापूर: ग्रामीण भागात २६० रूग्णांची नोंद; मंगळवेढ्यात न्यायाधीशाला करोनाची बाधा
Just Now!
X