बँकेकडून अडवणूक होत असल्यामुळे आपली शेतजमीन विकता येत नाही आणि इच्छा असूनही कर्ज फेडता येत नाही, अशी तक्रार करणाऱ्या कंधार तालुक्यातील धनाजी जाधव या शेतकऱ्याची व्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर गेली आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देत आयडीबीआय बँकेच्या कुरूळा शाखेच्या व्यवस्थापकांसह येत्या सोमवारी (३० डिसेंबर) हजर राहावे, असे कळविले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर पोहोचलेल्या या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याच्या तयारीसह आपल्यासोबत अंत्यविधीचे साहित्यही आणले होते, अशी माहिती गुरुवारी एका वृत्तवाहिनीने दिल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या शेतकऱ्याचे म्हणणे, त्याची कैफियत शांतपणे ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणात आयडीबीआय बँकेचे नाव आले. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत, जाधव यांच्या विषयात लक्ष घालण्याचे आदेश दिले.

या शेतकऱ्याचे संपूर्ण नाव धनाजी वसंतराव जाधव असे असून त्याने आयडीबीआय बँकेच्या कुरूळा शाखेतून घेतलेले कर्ज थकीत होऊन १७ लाखांवर गेले आहे. या शेतकऱ्याची जमीन बँकेकडे गहाण असतानाही मधल्या काळात त्याने या जमिनीची विक्री केली. पण या जमिनीवर बँकेचा बोजा असल्यामुळे महसूल खात्याच्या दफतरी फेरफार होऊ शकलेला नाही. त्यातून निर्माण झालेल्या अडचणींना कंटाळलेल्या या शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना गाठल्यानंतर त्याची कैफियत मुंबईहून नांदेडपर्यंत आली.

‘आयडीबीआय’च्या कुरुळा शाखेत डॉ. अमोल पाटील हे व्यवस्थापकपदी कार्यरत आहेत. त्यांच्याशी शुक्रवारी संपर्क साधला असता जिल्हाधिकाऱ्यांनी ३० डिसेंबर रोजी सर्व संबंधितांना पाचारण केल्याच्या माहितीला दुजोरा मिळाला. पाटील यांनी सांगितले,की  बँकेने संबंधित शेतकऱ्याची कोठेही अडवणूक केली नाही. त्यांना बँकेच्या एकरकमी तडजोड योजनेचा लाभ घेण्याचा प्रस्ताव दिला होता; पण त्यासाठी आवश्यक ती रक्कम ते भरू शकले नाहीत, त्यामुळे त्यांचे कर्जखाते अजूनही थकबाकीत आहे. या प्रकरणातील संपूर्ण वस्तुस्थिती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर करणार आहोत. कंधार तहसीलदार तसेच तलाठी व इतर संबंधितांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावले आहे.