दिल्लीमध्ये झालेली गारपीट, वाऱ्याने बदललेली दिशा आणि उत्तरेकडून येणाऱ्या बोचऱ्या वाऱ्यामुळे राज्यातील तापमानाचा पारा घसरला आहे. राज्यासह मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीची घट झाली आहे, तसंच मध्य महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाडाही गारठला आहे.

नाशिक जिल्ह्यात गोदाकाठचे तापमान शनिवारी पहाटे शून्य अंश सेल्सिअस झाले होते. ऊसाचे पाचट, गवताची पाने यावरील दवबिंदू गोठले होते. मुंबईचे किमान तापमान ११ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. चालू हंगामातील हे सर्वाधिक कमी किमान तापमान आहे. मागील चार दिवसांत मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशावरून थेट २४ अंशावर घसरले आहे. राज्यातील नीचांकी तापमान ४ अंश सेल्सिअस नाशिकमध्ये नोंदविण्यात आले, तर पुण्यात या हंगामातील नीचांकी ५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये दोन वृध्दांचा थंडीने गारठून मृत्यू झाला आहे. अजून एक ते दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दिवसासह रात्री वाहणारे थंड वारे कमाल आणि किमान तापमान घसरण्यास कारणीभूत आहेत. रविवारी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात शीतलहर तर मंगळवारी नाशिक जिल्ह्यात गारपीट होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. १० फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याचा अंदाज आहे. कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील. ११ ते १२ फेब्रुवारीदरम्यान कोकण, गोवा, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ११ आणि १२ फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात अवकाळी पाऊस, १२ फेब्रुवारीला उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपीट आणि १३ फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. रविवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २५, १३ अंशाच्या आसपास राहील. रविवारीही मुंबईचे किमान तापमान १३ अंशाच्या आसपास राहील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. परिणामी, मुंबईकर आणखी गारठणार आहेत.

किमान तापमान (अंश सेल्सिअस)

मुंबई (कुलाबा) १५.६, सांताक्रुझ ११.०, अलिबाग १३.२, रत्नागिरी ११.७, पुणे ५.१, नाशिक ४.०, नगर ६.१, जळगाव ८.०, कोल्हापूर १३.१, महाबळेश्वर ९.०, मालेगाव ७.८, सांगली ८.४, सातारा ६.८, सोलापूर १२.१, औरंगाबाद ६.५, परभणी ११.०, नांदेड ९.५, बीड ९.१, अकोला १०.०, अमरावती ९.०, बुलडाणा ९.२, ब्रम्हपुरी ११.३, चंद्रपूर १३.२, गोंदिया १२.४, नागपूर ८.९, वाशिम १४.२, वर्धा १३.०, यवतमाळ १०.४.