महापालिकेची सत्ता संपादन करण्यासाठी एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यास सुरुवात झाल्याचे गुरुवारी झालेल्या महासभेत दिसून आले. स्वाभिमानी विकास आघाडीला एकाकी पाडण्यासाठी दोन्ही काँग्रेस एकत्र आल्याने शोक प्रस्तावावरील चच्रेनंतर राष्ट्रवादीने केलेली तहकुबीची सूचना काँग्रेसने मान्य करीत स्वाभिमानी आघाडीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
लोकसभा निवडणुकीमुळे महापालिकेची महासभा गुरुवारी बोलावण्यात आली होती. सभेच्या प्रारंभीच स्वाभिमानी आघाडीच्या गौतम पवार यांनी फलक झळकावीत शहरवासीयांच्या नागरी समस्यांबाबत चर्चा करण्याची मागणी केली. या वेळी गटनेते शिवराज बोळाज यांच्यासह आघाडीचे सर्व सदस्य आसनावरून उठून प्रशासन झोपले आहे की काय? असा प्रश्न करीत होते. मात्र सत्ताधारी गटाकडून विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन करण्याचा आग्रह धरण्यात आला. या गोंधळातच मागील सभेचे इतिवृत्त वाचन करण्यात आले.
केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे, माजी आ. व्यंकाप्पा पत्की यांच्यासह अनेक मान्यवरांच्या निधनाबद्दल सभागृहात शोक प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर अभिनंदनाच्या ठरावाचे वाचन करण्यापूर्वी राष्ट्रवादीचे संजय बजाज यांनी दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी सभा तहकुबीची मागणी केली. या मागणीला स्थायी सभापती राजेश नाईक यांनी अनुमोदन दिले. सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन महापौर श्रीमती कांचन कांबळे यांनी सभा तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा करून सोमवारी सकाळी ११ वाजता तहकूब सभा पुढे चालू होईल असे सांगितले.
सभा तहकुबीची मागणी करणा-या सदस्यांनाही केवळ पंधरा मिनिटांसाठी कामकाज तहकूब होईल अशी अपेक्षा होती मात्र सोमवापर्यंत सभा तहकूब झाल्याने प्रशासनाला धारेवर धरण्याचा विकास महाआघाडीचा डाव उधळला गेला. या मागे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मिलिभगत असल्याचा आरोप स्वाभिमानी सदस्यांनी केला.
महासभेपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरातील नागरी समस्यांकडे प्रशासनाचे व पदाधिका-यांचे दुर्लक्ष होत असल्याचे निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. महापालिका बरखास्त करून सांगली, मिरज आणि कूपवाडसाठी ग्रामपंचायत स्थापन करावी, अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली.