दहशतवादाविरोधात लढा देणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या रोखठोक भूमिकेचा निर्णय आज १६ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीतून लागणार आहे. राष्ट्रवादीच्या या मोठय़ा ग्रुपची भूमिका पक्षासाठी मारक की तारक ठरणार आहे, हेही स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालपर्यंत आमदार दीपक केसरकर यांना फटकारले आहे. आमदार दीपक केसरकर, माजी आमदार पुष्पसेन सावंत, माजी आमदार शंकर कांबळी, शिवाजीराव कुबल, कुलदीप पेडणेकर, सुरेश दळवी यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणूकीत घेतलेली भूमिकेला  मतदारांनी कसा प्रतिसाद दिला आहे ते मतमोजणीतून उघड होणार आहे.
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या बंडोबांना डोस पाजले असल्याचे सांगण्यात येते. शरद पवार यांनी पक्षापेक्षा कोणीही मोठा नसल्याचे सांगत चुका सुधारण्याची संधीही देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीचे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील आघाडीचे वास्तव्य उघड होणार आहे.
या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. नीलेश राणे की, शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार विनायक राऊत विजयी होतात याकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे. पण त्याही पेक्षा राष्ट्रवादीच्या बंडोबांनी पक्षाचा आदेश झुगारून काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला विरोध केल्याने त्यांच्या भूमिकेवर सिंधुदुर्गवासीयांचा ठसा कसा उमटतो याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात शिवसेना महायुतीच्या भूमिकेपेक्षा राष्ट्रवादीचे आमदार केसरकर व सहकाऱ्यांच्या भूमिकेला कितपत सिंधुदुर्गवासीय साथ देतात याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.