लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती निच्चांकी पातळीवर खाली आलेल्या असतानाही मोदी सरकार त्याचा थेट लाभ सामान्य जनतेला होऊ देत नाही. उलट सलग १९ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढच केली जात आहे. करोनामुळे जगणे कठीण झाले असताना ही भाववाढ सामान्य जनतेवर अन्याय करणारी आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात मोदी सरकार विरोधात सोमवारी काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलन छेडल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी दिली.

२९ जूनला केंद्र सरकारच्या विरोधात सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी १० ते १२ या वेळत दोन तास धरणे आंदोलन करून इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली जाणार आहे. हे आंदोलन नियम पाळून करण्यात येईल. याच दिवशी ऑनलाइन मोहीम समाजमाध्यमावर चालवली जाईल. त्यानंतर या मोहिमेचा दुसरा टप्पा ३० जून ते ४ जुलै या सप्ताहात ब्लॉक व तालुका स्तरावर धरणे आंदोलन करून केला जाणार आहे. या आंदोलनासाठी विभागनिहाय समन्वयक नियुक्त केले आहेत.

देशासमोर करोनाचे संकट असताना केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे चीनसोबत युद्धजन्य परिस्थिती व पेट्रोल-डिझेलची दरवाढ या दुहेरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याविरोधात काँग्रेस पक्ष मैदानात उतरला आहे, असे डॉ.ढोणे म्हणाले. या आंदोलनास सर्वसामान्य जनतेचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळेल, असा विश्वाासही त्यांनी व्यक्त केला.