कल्याणकारी मंडळ सदस्य नोंदणी आणि नूतनीकरण रखडले; योजनांच्या लाभापासून वंचित

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळाचे नोंदणी करणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या उदासीनतेमुळे सुमारे हजारो कामगार मंडळाच्या लाभदायी योजनेपासून वंचित राहिले आहे. पालघर जिल्ह्य़ात १८ हजारहून अधिक कामगारांची नोंदणी असली तरी नोंदणी झालेल्या अर्ध्याहून अधिक कामगारांचे सदस्यत्वाचे नूतनीकरण न झाल्याने हे कामगार योजनेपासून उपेक्षित राहिले आहे.  तर हजारो कामगारांची नोंदणीही झालेली नाही.

बांधकाम क्षेत्रात काम करणारे बिगारी, कडिया, सुतार, मदतनीस, फॅब्रिकेटर  व इतर कुशल कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ कार्यरत आहे. ९० दिवसांपेक्षा जास्त काम करणाऱ्या आणि नोंदणी झालेल्या कामगारांसाठी हे मंडळ विविध योजना राबवीत असते. कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, त्यांना सुरक्षा उपकरणांचा संच देणे व त्यासोबत इतर योजनांमार्फत त्यांना लाभ मिळवून देत असते.  गेल्या वर्षांत विविध योजनेद्वारे नऊ हजार ८३६ कामगारांना सुमारे पाच कोटी सहा लाख रुपयांची मदत देण्यातआली आहे, तर करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या वतीने प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदतही देण्यात आली आहे.  पालघर जिल्ह्य़ात १८ हजाराहून अधिक बांधकाम कामगार नोंदणीकृत आहेत. त्यातील केवळ सात हजार ४४१ कामगारांना योजनेचा लाभ घेता आला आहे. इतर कामगारांचे सदस्यत्वाचे नूतनीकरण न झाल्याने ते योजनेपासून वंचित राहिले आहेत.

महानगरपालिका, नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था तसेच वेगवेगळ्या ठेकेदारांमार्फत काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी स्थानिक स्वराज्य संस्थेने नेमलेल्या सक्षम अधिकाऱ्यांमार्फत या कल्याणकारी मंडळावर करणे अपेक्षित असते.  गृहनिर्माण प्रकल्प तसेच इतर बांधकाम प्रकल्पांमधील कामाला आरंभ करताना मंडळांना कळविणे व तेथील कामगारांची नोंदणी करणे हेही अपेक्षित असते.

बांधकामांप्रमाणे कर स्वरूपात वसूल केलेल्या रकमेतून अशा कामगारांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. पालघर जिल्ह्याचा झपाटय़ाने विकास होत असताना या भागात लाखोंच्या संख्येने कामगार काम करत असताना त्यांची योग्य पद्धतीने नोंदणी होत नसल्याची खंत या मंडळाचे पूर्व सदस्य राहिलेल्या केदार काळे यांचे म्हणणे आहे. त्यांनी तारापूरच्या कामगार उपायुक्तांना पत्र लिहून नोंदणी प्रक्रिया तसेच सदस्यत्वाचे नूतनीकरण कार्यक्रम हाती घेण्याचे मागणी केली आहे.

ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया विचाराधीन

या संदर्भात तारापूरचे कामगार उपायुक्त किशोर दहिफळकर यांच्याशी संपर्क साधला असता राज्य शासनामार्फत अशा कामगारांची ऑनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. तरीदेखील करोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत तसेच ठेकेदारांशी संपर्क साधून किंवा सामाजिक संस्थांची मदत घेऊन नव्याने बांधकाम कामगारांची कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येईल, असे त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.