17 January 2021

News Flash

दिवाळीनिमित्ताने फराळाची लगबग

घरगुती तयार फराळाला ग्राहकांची पसंती

घरगुती तयार फराळाला ग्राहकांची पसंती

वसई : अवघ्या दोन दिवसांवर दिवाळीचा सण आला आहे. त्यामुळे महिलावर्गाची  विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. तर दुसरीकडे घरगुती तयार फराळाची मागणीही वाढली आहे. करंज्या, चकली, अनारसे, शंकरपाळे यासारख्या विविध प्रकारच्या फराळाच्या पदार्थाची मागणीही वाढली आहे.

दिवाळीच्या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी महिला बचत गटांच्या मार्फत तयार केलेल्या फराळाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. तर काही महिला घरूनच फराळ तयार करून विक्री करीत आहेत. यावर्षी करोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत अनेकांची आर्थिक घडी विस्कटली होती अशा महिलांनी यावर्षी फराळ विक्रीतून हातभार लागेल या हेतूने व्यवसाय सुरू केले आहेत. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

ज्या महिलांना कामानिमित्ताने फराळ तयार करण्यास वेळ मिळत नाही. अशा महिलांचा हा फराळ खरेदीकरण्याकडे अधिक कल असतो. यंदाच्या वर्षी करोनामुळे बाजारपेठेत गर्दी दिसून येत नसली तरी ऑनलाइन स्वरूपात या फराळाची विक्री वाढली आहे. वसईतील महिलांना विशेषकरून वसई-विरारसह मुंबईच, दादर, माटुंगा, अंधेरी, मीरा रोड या भागातून परराज्यातील गोवा येथेही फराळ पार्सल जाऊ लागला आहे. यामध्ये लाडू, चकल्या, करंज्या, लेयर करंजी, शंकरपाळे, चिरोटे, चिवडा, नारळवडी अशा विविध प्रकारच्या फराळाचा समावेश आहे.

दिवसेंदिवस फराळाची मागणी वाढत असल्याने फराळ तयार करण्यासाठीही काहींना महिला कामगारांची गरज भासू लागली आहे. तर दुसरीकडे  यंदाच्या वर्षी करोनाचे संकट आले त्यामुळे अनेकजण आर्थिक अडचणी आहेत. त्यामुळे काही भागात ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद हा थोडाफार कमी आहे. परंतु यावर्षी परिस्थितीचे भान ठेवून सर्वसामान्य नागरिकाला परवडेल अशा दरातही फराळ उपलब्ध करून  देत  असल्याचे नालासोपारा येथील श्री. गजानन घरगुती फराळ विक्रेते महेश गोहिल यांनी सांगितले आहे.

फराळाचे दर

शंकरपाळे            ४३० किलो

करंज्या               ५५० किलो

लेयर करंजी           ८०० किलो

ड्रायफ्रुट करंजी       ७५० किलो

चिवडा                   ३४० किलो

चकली                    ४५०किलो

चिरोटे                    ४२० किलो

नारळवडी              ५६० किलो

परदेशातही फराळाला मागणी

दिवाळीचा सणाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या फराळाची मागणी केवळ शहरात व राज्यातच नाही तर परदेशातही जाऊ लागली आहे. परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांनीही या घरगुती तयार केलेल्या फराळाला पसंत दिली आहे. नायगाव पूर्वेतील अन्नपूर्णा किचन होममधून यंदाच्या दिवाळीसाठी अमेरिकेला ही फराळ पार्सल पाठवण्यात आला आहे असे, विक्रेत्या चैताली कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 1:39 am

Web Title: consumers prefer homemade diwali faral zws 70
टॅग Diwali
Next Stories
1 डहाणूत जेट्टीसाठी मोबदल्याचा प्रस्ताव
2 जलवाहिनीसाठी महावृक्षांवर कुऱ्हाड
3 रत्नागिरी जिल्ह्य़ात किसान सन्मान योजनेचे पाच हजार लाभार्थी अपात्र
Just Now!
X