जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात पावसाची संततधार कायम राहिल्याने धरणांच्या जलसंचयात झपाटय़ाने वाढ होऊ लागली आहे. धरणांच्या जलसाठय़ाची क्षमता लक्षात घेता सध्या धरणांमध्ये ४० टक्के पाणीसाठा असल्याचे अधिकृत आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. यामुळे सध्यातरी जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याचे संकट दूर झाल्याचे दिसत आहे. पडत असलेल्या पावसाचे प्रमाण पाहता पाणीसाठय़ात आणखी वाढ होऊन शेतीच्या पाण्याचा प्रश्नही सुटेल अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. तर धरणांतील पाणीसाठा वाढत चालल्याने जिल्ह्यातील सर्वच नद्या आता दुथडी भरून वाहताना दिसू लागल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिवर्षी मृग नक्षत्रापासून पावसाला सुरुवात होते. यंदा मृग संपून महिना उलटला तरी पाऊस न पडल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली होती. धरणांचा पाणीसाठा कमालीचा कमी झाला होता. क्षमतेच्या दहा ते वीस टक्के इतका जलसंचय असल्याने प्रशासनाची चिंताही वाढली होती. तथापि गेला आठवडाभर सह्याद्री पर्वतरांगाच्या भागामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड या पश्चिमेकडील तालुक्यातील पावसाची संततधार कायम आहे. याच भागात जिल्ह्यातील बहुतांशी धरणे आहेत. या भागात पावसाने उघडीप न दिल्याने पाणीसाठा वाढत जाऊन धरणाच्या जलसंचयाच्या सुमारे ४० टक्के इतका संचय झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या मिटण्यास मदत झाली आहे.
 धरणांचा पाणीसाठा
जिल्ह्यात आज सकाळी ७ वाजता झालेल्या नोंदीनुसार धरणांच्या पाणीसाठय़ाची माहिती पुढीलप्रमाणे आहे. अनुक्रमे धरणाचे नाव, आजचा पाणीसाठा, पूर्णसंचय पाणीसाठा कंसामध्ये दर्शविण्यात आला आहे. सर्व आकडे दशलक्ष घनमीटरमध्ये आहेत.
राधानगरी ९६.७९ (२३६.७९), तुळशी ३२.६७ (९८.२९), वारणा ३९५.३५ (९७४.१८), दूधगंगा १८८.४८ (७१९.१२), कासारी ३२.२८ (७८.५६), कडवी ३८.४० (७१.२४), कुंभी ३.९० (७६.८८), पाटगाव ४४.३६ (१०५.२४), चिकोत्रा ८.६६ (४३.११), चित्री ११.६४ (५३.४१), जंगमहट्टी ९.६१ (३४.६५), घटप्रभा ४३.६५ (४३.६५), जांबरे ६.३९ (२३.२३), कोदे ल. पा. ६.०६ (६.०६).
दरम्यान, गेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १२३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, त्या खालोखाल शाहूवाडी तालुक्यात ५९.५० इतक्या पावसाची नोंद झाली. गेल्या चोवीस तासांत सरासरी ३७.६० मि.मी. इतका पाऊस झाला. भोगावती नदीचे खडक कोगे, सरकारी कोगे, पंचगंगा नदीचे िशगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.