मुंबईतील करोनाग्रस्तांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईतील करोनाबाधितांची संख्या १६२ वर पोहोचली असून पाच हजारांपेक्षा अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. राजेश टोपे यांनी आज मुंबई महापालिकेच्या वॉर रुमला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथे बैठक घेतली. या बैठकीनंतर बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
राजेश टोपे यांनी सांगितलं की, “मुंबईतील करोनाबाधितांची संख्या १६२ झाली आहे. पाच हजारांहून अधिक जण असे आहेत जे अशा लोकांच्या संपर्कात आले असून हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आहेत. ही संख्या आता ५३४३ इतकी आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेऊन चाचणी केली जाणार आहे. सध्या सर्वांवर लक्ष ठेवलं जात आहे. चार हजार लोक या सर्वांवर लक्ष ठेवून आहेत”. दरम्यान मुंबईतील वाढता आकडा चिंतेची बाब आहे. पुढे हे आव्हान कसं पेलायचं यासंबंदी बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.
करोनाचे रुग्ण वाढले आहेत पण त्याचं संक्रमण वाढू नये यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. जे लोक हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांच्यावर पूर्ण बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. चार हजार लोकांच्या माध्यमातून परिस्थिती नियंत्रणात राखण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
“मुंबई शहरात पाच सरकारी, सात खासगी रुग्णालयांमध्ये करोनचाी चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध असून दोन हजार चाचण्या दिवसाला होऊ शकतात इतकी क्षमता आहे. पण सध्या दिवसाला १२०० चाचण्या होत आहेत. जे प्रोटोकॉल आहेत त्याप्रमाणे चाचणी केली जात आहे. त्यामुळे अतिरिक्त करण्याची आज गरज नाही. तसंच ४६ नवे व्हेंटिलेटर्स आज मिळाले आहेत. १ लाख एन-९५ मास्क उपलब्ध आहेत,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 1, 2020 3:18 pm