सोलापूर शहर आणि जिल्ह्यात करोनाचा कहर वाढला असताना त्यावर नियंत्रण मिळविण्याचे प्रशासनासमोरील आव्हान अद्यापही कायम आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूरच्या एका कोविड केअर सेंटर यशस्वी उपाययोजनांच्या माध्यमातून चर्चेत आले आहे. एवढेच नव्हे तर हे कोविड केअर सेंटर संपूर्ण जिल्ह्यातील सर्व केअर सेंटरसाठी पथदर्शी बनले आहे. करोनाबाधित रूग्णांना योग्य उपचार व सकस आहारासह योग व प्राणायामांसह संगीत, गाणी, नृत्य आणि समुपदेशन या माध्यमातून आधार मिळत असल्याची प्रचिती द. सोलापूर तालुक्याच्या कोविड केअर सेंटरमध्ये आली आहे. शहरातील विजापूर रस्त्यावर छत्रपती संभाजी कंबर तलावालगत शासकीय केटरिंग कॉलेजच्या इमारतीत हे कोविड केअर सेंटर कार्यरत आहे. येथील यशस्वी प्रयोग जिल्ह्यातील इतर कोविड केअर सेंटरमध्ये केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

छत्रपती संभाजी कंबर तलावाच्या नजीक महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट आॕफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी कॉलेजच्या इमारतीत करोनाबाधितांसाठी २७ मे पासून कोविड केअर सेंटर कार्यरत झाले आहे. या सेंटरची ३३८ बाधित रूग्णांना सामावून घेण्याची क्षमता आहे. सध्या १७८ बाधित रूग्णांवर उपचार होत आहेत. उपचारासह अन्य बाबींसाठी हे कोविड केअर सेंटर सध्या चर्चेत आले आहे. येथे उपचारासह सकस आहार रूग्णांना दिला जातो. याशिवाय नियमित योग व प्राणायामाचे धडे रूग्णांना दिले जातात. त्यासाठी रवी कंटल आणि शिवानंद पाटील हे योग प्रशिक्षक सेवाभावनेने आपले कर्तव्य पार पाडत आहेत. प्राणायामामुळे रूग्णांची मानसिकता सकारात्मक बनते. तसेच श्वसनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. त्यांचे समुपदेशन केले जाते. दक्षिण सोलापूर तालुक्याचे आरोग्याधिकारी डॉ. दिगंबर गायकवाड यांनी ही माहिती दिली.

करोनाची बाधा झालेल्या रूग्णांमध्ये सुरूवातीला प्रचंड भीती निर्माण होते. त्यांची मानसिकता खचून जाते. भीतीमुळे रूग्ण गांगरून आणि घाबरून जातात. त्यांना मानसिक आधार देणे महत्त्वाचे असते. करोनाचा आजार बरा होऊ शकतो, याची शाश्वती तथा विश्वास दिल्यास रूग्ण मानसिक धक्क्यातून बाहेर येतो. त्यासाठी या कोविड केअर सेंटरमध्ये योग्य प्रकारे समुपदेशन करण्याबरोबरच रूग्णांना योग्य उपचार आणि सकस आहार दिला जातो. सोबत संगीत, गाणी, नृत्य अशी करमणूकही केली जाते. त्यामुळे रूग्णांमध्ये आपल्या आजारपणाची भीतीयुक्त जाणीव कायम न राहता ती दूर होण्यास मदत होते. त्यांना पुरेशी झोप मिळते आणि पर्यायाने त्यांची प्रतिकारशक्तीही वाढण्यास मदत होते. सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता रमेश शिंदे हे स्वतः शाहीर आहेत. त्यांच्याकडूनही शाहिरीची सेवा होते.

‘एफएम’चीही सेवा याठिकाणी उपलब्ध आहे. दुपारी एक ते चार या वेळेत विश्रांतीसाठी संगीत, गाणी बंद ठेवली जातात. दिवसातून तीन वेळा डॉक्टरांकडून रूग्णांची तपासणी होते. रूग्णांच्या समस्या जाणून घेतल्या जातात. हृदयाचे ठोके आणि ऑक्सिजनचे प्रमाण तपासून औषधे देणे, प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी प्रतिजैविके देणे इत्यादी सेवेसाठी समन्वयक डॉ. प्रवीण खारे यांच्यासह पाच वैद्यकीय अधिकारी झटत आहेत. या ठिकाणी दिवसातून चारवेळा स्वच्छता केली जाते. पाच नोडल अधिकारी, सहा आरोग्यसेविका, पाच फार्मासिस्ट,पाच कक्षसेवक, एक तंत्रज्ञ, सहा शिपाई, चार होमगार्ड, तीन रखवालदार आणि बारा सफाई कर्मचारी याप्रमाणे अन्य मनुष्यबळ याठिकाणी कार्यरत आहे.

या कोविड केअर सेंटरमधून आतापर्यंत १३८ बाधित रूग्ण करोनामुक्त होऊन घरी परत गेले आहेत. कोविड केअर सेंटरमधून ठणठणीत बरे होऊन घरी परत जाताना करोनामुक्त रूग्ण भावनिक होतात.