नीरज राऊत

पालघर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी विक्रमगड येथील रिवेरा या सर्वात मोठ्या उपचार केंद्रात ४० व्हेंटिलेटर उपलब्ध असले तरी सुद्धा या उपकरणाला रुग्णांशी जोडण्यासाठी लागणारे कनेक्टर विकत घेतले नसल्याने ही यंत्रणा आवश्यक प्रमाणात वापरात नाही. सुरू असणाऱ्या काही वेंटिलेटरला प्राणवायू कमी दाबाने मिळत असल्याच्या तक्रारी पुढे येत असून जिल्ह्यात गंभीर होणाऱ्या रुग्णांना इतरत्र हलवण्यास पर्याय नसल्याची माहिती पुढे येत आहे.

रिवेरा उपचार केंद्र नव्याने उभारण्यात आलेल्या प्राणवायू प्रणालीमध्ये अनेक ठिकाणी गळती निर्माण झाल्याने अति दक्षता विभाग व व्हेंटिलेटरला कमी दाबाने प्राणवायू पुरवठा होत आहे. त्याच बरोबरीने व्हेंटिलेटरला रुग्णांशी जोडण्यासाठी लागणारे कनेक्टर उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती आली असून या व्हेंटिलेटर खरेदीवर खर्च झालेला पैसा सध्यातरी उपयोगी येत नाही. शिवाय व्हेंटिलेटर चालवण्यासाठी कुशल डॉक्टर (इन्सेंटिविस्ट) 24 तास उपलब्ध नसल्याने गंभीर रुग्णांना इतरत्र हलवणे भाग पडत आहे. तज्ज्ञ डॉक्टर राज्यातील इतर भागातून मिळवण्यासाठी पालकमंत्री व इतर लोकप्रतिनिधी यांचे प्रयत्न तोकडे पडताना दिसत आहेत.

रिवेरा केंद्रामध्ये जुन्या प्रणालीचे (नॉन-डिजिटल) एक्स-रे मशीन आहे. त्यामुळे छातीच्या फोटोंसाठी रुग्णांना बोईसर येथे एका खासगी सिटी स्कॅन केंद्रावर पाठवणे भाग पडत आहे. अशा परिस्थितीत गंभीर होऊ पाहणाऱ्या रुग्णांना बोईसरचा प्रवास करण्यास अडीच ते तीन तास लागत असून अशावेळी रुग्णांची स्थिती अधिक बिकट होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. ज्याप्रमाणे या आरोग्य केंद्राला द्रव्य रूपातील प्राणवायूची टाकी बसवणे आवश्यक होते त्याच पद्धतीने मोठ्या संख्येने व्हेंटिलेटर खरेदी करण्याऐवजी सिटी स्कॅन मशिन खरेदी करणे गरजेचे होते असे उपचार करणाऱ्या मंडळींकडून खासगी सांगण्यात येते.

आणखी वाचा- उस्मानाबाद : अनलॉक 3.0च्या पूर्वसंध्येला करोनाग्रस्तांची संख्या हजारांपार

करोना रुग्णांना जिल्ह्यात प्राथमिक उपचार दिले जात असलेले तरी गंभीर होणाऱ्या रुग्णांना वसई- विरार महानगरपालिका क्षेत्रात किंवा ठाणे- मुंबई येथे पाठवण्यात येते. अशा वेळी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून समन्वय साधण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सक्षम नसल्याचे दिसून आले आहे. करोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी 24 तास सुरू असणारे मदत केंद्र व मदत वाहिनी सुरु करण्याची घोषणा कागदावर राहिली आहे. गंभीर होणार या रुग्णांसाठी मुंबई येथील नामांकित रुग्णालयात पालघर जिल्ह्यासाठी काही खाटा आरक्षित करून ठेवण्याची गरज भासत असून त्याविषयी यंत्राने तातडीने निर्णय घेणे आवश्यक झाले आहे. जिल्ह्यात सध्या संसर्ग झालेल्या रुग्णाच्या अति जोखीम संपर्कातील व्यक्तींच्या तपासणी वर भर दिला जात असला तरीसुद्धा अलगीकरण व विलगीकरण कक्षातील असुविधेबाबत दाखल होणाऱ्या नागरिकांकडून तक्रारी नोंदवल्या जात आहेत. त्यामुळे ताप, सर्दी- खोकला किंवा करोनाची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांकडून शासकीय यंत्रणेत तपासणी करण्यास टाळाटाळ होत असल्याचे दिसून येते.

आणखी वाचा- Coronavirus : लक्षणे नसलेल्या बाधितांना घरीच उपचार घेण्याची मुभा – पालकमंत्री

जिल्ह्यात खाजगी डॉक्टरांची सेवा करोना रुग्णांसाठी अधिग्रहित केल्या असताना त्यांना नेमणूक पत्र, विमा कवच तसेच इतर सुविधा पुरवल्या जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी यांच्या साठी वैयक्तिक सुरक्षा उपकरणे (पीपीई किट्स) व एन- 95 मास्क संख्या मर्यादित असून अत्यावश्यक इंजेशन व औषधाचा साठा काही दिवसांपुरता मर्यादित असल्याची माहिती पुढे येत आहे. एकंदर शासकीय व्यवस्थेचे मधील मधील समन्वयाच्या अभावामुळे सर्वसामान्य माणसाचा शासकीय यंत्रणा मधील विश्वास कमी होत चालला आहे असे चित्र आहे.

रूग्णांसाठी चोवीस तास उपलब्ध होणारी मदत वाहिनी तसेच विविध रुग्णालयातील रुग्ण संख्या, रिकामी खाटा यांची संख्या, संपर्क क्रमांक लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. तसेच इतर करोना उपचार केंद्रामधील त्रुटी दूर करून आवश्यक साधन सामग्री, औषधे, इंजेक्शने उपलब्ध करण्यासाठी शल्य चिकित्सक प्रयत्नशील असल्याचे देखील सांगण्यात आले.