रमेश पाटील, लोकसत्ता

वाडा :  करोनाच्या पार्श्वभूमीवर  रखडलेले विवाह साध्या, सोप्या पद्धतीने करून विवाहाच्या अमाप खर्चाला कात्री लावण्याचा वाडा तालुक्यात अनेकांनी विवाह इच्छुक मंडळींनी घेतल्याने लाखो रुपयांची बचत झाली आहे. वाडा तालुक्यात  गेल्या  दोन महिन्यांत झालेल्या दीडशेहून अधिक विवाह हे साधेपणाने झाले आहेत.

दरवर्षी एप्रिल, मे या दोन महिन्यांत पालघर जिल्ह्यतील विविध गावांमध्ये दोन हजारांहून अधिक विवाह सोहळे होत असतात. जिल्ह्यत विवाह सोहळ्याच्या आदल्या रात्री होणाऱ्या हळदी समारंभाला लाखो रुपयांचा खर्च मटणाच्या जेवणावळी, विद्युत रोषणाई, डीजे, विविध प्रकारची वाद्ये यावर केला जात असतो. एकेका विवाह सोहळ्यात दीड ते दोन हजार वऱ्हाड मंडळींची उपस्थिती असते. त्यांच्या सोयीसुविधांसाठी भला मोठा लग्न मंडप, बैठक व्यवस्था या सर्वावर आठ ते दहा लाख रुपये खर्च केला जातो. या वेळी मात्र करोनाच्या पाश्र्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या टाळेबंदीत होत असलेल्या विवाह सोहळ्यांमध्ये सर्वच खर्चाना चांगलीच कात्री बसली आहे.  संभाव्य होणाऱ्या खर्चाच्या १० ते १५ टक्के खर्चातच लग्नसोहळे होऊ  लागल्याने  यजमानांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

काहींनी लग्नसोहळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शासनाने पन्नास वऱ्हाड मंडळींच्या उपस्थितीला परवानगी दिल्याने आणि वर्षभर करोनाचा संसर्ग राहण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अनेकांनी पुढे ढकलण्याचा निर्णय मागे घेऊन ठरलेल्या मुहूर्तावरच अत्यंत साधेपणाने लग्नसोहळे उरकण्यात धन्यता मानत आहेत.

दरम्यान मोठय़ा दाम दिमाखात होणाऱ्या विवाहसोहळ्यांच्या माध्यमातून चार पैसे कमावणाऱ्या छायाचित्रकार, स्वयंपाकी, वाजंत्री, मंडप व्यवसायिक, कॅटर्स, वाढपी यांच्यावर मात्र मोठी संक्रांत आली आहे. या विविध व्यवसायांच्या माध्यमातून रोजगार मिळणाऱ्या हजारो मजुरांच्या पोटाला मात्र चिमटा बसला आहे.

प्रतिष्ठा जोपासण्यासाठी विवाह सोहळ्यावर लाखो रुपये उधळण्यापेक्षा हाच पैसा वधू-वरांच्या भावी संसारासाठी वधू-वर पित्यांनी खर्च करावा व अशाच कमी खर्चाचे विवाह सोहळे पार पाडावेत.

– दत्तात्रेय पठारे,पदाधिकारी, वधू-वर सूचक मंडळ, पालघर जिल्हा.

विवाह सोहळ्यासाठी लागणाऱ्या मंडप व्यावसायाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळत असतो, पण हा रोजगारच ठप्प झाला आहे.

– सुजीत पाटील, मालक, श्री मंडप डेकोरेटर्स, पीक, ता. वाडा.