19 November 2017

News Flash

टेंभू, म्हैसाळ योजना पूर्ण करण्याची मागणी

पश्चिम महाराष्ट्रातील १३ तालुक्यांचा दुष्काळ हटविण्यासाठी वरदायी ठरणाऱ्या टेंभू व म्हैसाळ या दोन उपसा

सांगली | Updated: June 30, 2013 12:08 PM

पश्चिम महाराष्ट्रातील १३ तालुक्यांचा दुष्काळ हटविण्यासाठी वरदायी ठरणाऱ्या टेंभू व म्हैसाळ या दोन उपसा जलसिंचन योजना राज्य शासनाने तातडीने पूर्ण कराव्यात, अन्यथा मंत्र्यांना गावबंदी करण्याबरोबरच दिल्लीला आंदोलन उभारण्याचा इशारा हुतात्मा शिक्षण व उद्योगसमूहाचे नेते वैभव नायकवडी यांनी दिला.
शेतमजूर, कष्टकरी व शेतकरी संघटनेच्या वतीने आटपाडी येथील भवानी विद्यालयाच्या मैदानावर आटपाडीसह सांगोला, माण, खटाव, खंडाळा, मंगळवेढा, माढा, जत, तासगाव, कवठेमहांकाळ, कडेगाव, खानापूर, फलटण व मिरज (पूर्व) या दुष्काळी तालुक्यांची २१वी पाणी परिषद झाली. त्या वेळी वैभव नायकवडी बोलत होते. या दुष्काळी परिषदेच्या अध्यक्षस्थानी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख होते.
काही मंत्र्यांनी दुष्काळग्रस्तांची यंदाची दीपावलीची अंघोळ टेंभू योजनेच्या पाण्याने होईल, अशी ग्वाही दिली आहे. या ग्वाहीचे स्वागत केले तरी मंत्र्यांच्या बोलण्यावर विश्वास कोणी ठेवायचा, असा प्रश्न आहे. आपण गाफील राहिलो, तर ही दीपावली का पुढची दीपावली, असा प्रश्न निर्माण होईल. सध्या काही तालुक्यांत आलेल्या पाण्याचे पूजन केले जात आहे. या पाणीपूजनाच्या फोटोला भुलू नका. शेवटच्या टप्प्यापर्यंत व शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचेपर्यंत ही पाणी चळवळ सुरूच राहील.
सध्याच्या नियोजनानुसार केवळ ओढय़ांनी पाणी येऊन उपयोगाचे नाही, तर सर्व योजनांच्या कालव्यांची कामेही झाली पाहिजेत. त्यामुळे १५० ते २०० कोटी रुपयांच्या निधीतून ही सर्व कामे होणार नाहीत. त्यासाठी राज्य शासनाने पाच हजार कोटी रुपयांचा निधी दिला पाहिजे. नुसते पाणी येऊन चालणार नसून विजेचे दरही कमी केले पाहिजेत. कृषिपंपांना सलग वीजपुरवठा केला गेला पाहिजे. विजेचे दर व पाणीपट्टी शेतकऱ्यांना परवडली पाहिजे, अशी मागणीही वैभव नायकवडी यांनी केली.
गणपतराव देशमुख यांनी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातील या दोन योजनांसाठी प्रत्येकी १५२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा निधी मार्च महिनाअखेरीस न मिळता विधान सभेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मिळाला पाहिजे. अन्यथा, यापुढील आंदोलनाची सुरुवात या अधिवेशनापासूनच करावी लागेल. पाणी प्रत्यक्षात आताच जर मिळाले नाही, तर पुन्हा कधी मिळेल, हे सांगता येत नाही. त्यासाठी या चळवळीचा शेवटचा दणका देण्यासाठी सर्व घटकांनी सज्ज व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या पाणी परिषदेत माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, बाळासाहेब नायकवडी, प्रा. शिवाजीराव काळुंगे, प्रा. शरद पाटील, प्रा. दादासाहेब ढेरे, प्राचार्य आर. एस. चोपडे व अ‍ॅड. बाळासाहेब बागवान यांची भाषणे झाली. या पाणी परिषदेस प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, सरपंच गौरव नायकवडी, नजीर वलांडकर, एन. एल. कापडनीस, बळी मोरे, अ‍ॅड. उस्मानबी शेख व भगवान मोरे आदी उपस्थित होते.

First Published on June 30, 2013 12:08 pm

Web Title: demand for complete of tembhu mhaisal project