12 November 2019

News Flash

सनातन संस्थेवर बंदीसाठी निदर्शने

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येशी संबंधित सनातन संस्थेवर बंदी घालावी या मागणीसाठी डाव्या संघटनांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली

कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येशी संबंधित सनातन संस्थेवर बंदी घालावी, तसेच तपासात हस्तक्षेप करून पोलिसांना धमक्या देणा-यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी डाव्या संघटनांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली तसेच मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना देण्यात आले.
भाकपचे राज्य सहसचिव सुभाष लांडे, शांताराम वाळुंज, सुधीर टोकेकर, बहिरनाथ वाकळे, शंकर न्यालपेल्ली, संजय नागरे, बाबा अरगडे, भगवान गायकवाड, बाबुराव राशिनकर, अनंत लाखंडे, रामदास वाघस्कर, अप्पासाहेब वाबळे, व्यंकटेश बोगा, नानासाहेब कदम, संपत रोहकले आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.
कॉ. पानसरे यांच्या हत्येशी संबंधित समीर गायकवाड, श्रीराम गायकवाड व सुधीर जाधव या सनातन संस्थेच्या तीन कार्यकर्त्यांना सात महिन्यांनंतर अटक करण्यात आली. पोलिसांवर दबाव असल्याने तपासात दिरंगाई होत आहे. चार दिवसांपूर्वी सनातन संस्थेच्या संकेतस्थळावर पोलिसांना जाहीर धमक्या देऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी या तीन विवेकवादी व धर्मनिरपेक्ष व्यक्तींच्या हत्येमागे समान कार्यपद्धती असलेल्या सनातन संस्थेवर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सन २००८ ते २०११ दरम्यान सनातन संस्था ही दहशतवादी कारवायात गुंतलेली असल्याने त्यांच्यावर बंदी घालावी, असा प्रस्ताव एटीएसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे व राकेश मारिया यांनी दाखल केला होता. हा प्रस्ताव जनतेसमोर जाहीर करावा, दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी या तिघांच्या हत्येचा सखोल तपास करुन मारेकरी व त्यामागील सूत्रधारांना कठोर शासन करावे, पोलिसांना अध्यात्मिक शिक्षेच्या नावाखाली धमकी देणा-यांवर अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायद्यान्वये कारवाई करावी, आदी मागण्या करण्यात आल्या.

First Published on September 22, 2015 3:30 am

Web Title: demonstrations for ban on sanatan organization