माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरीतील मोरया युथ फेस्टिव्हलला हजेरी लावली होती. यावेळी त्यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांना दिलखुलास आणि खास त्यांच्या शैलीत उत्तरं दिली. त्यानंतर राहुल सोलापूरकर या मुलाखतीचा समारोप करत होते. त्यांनी हेदेखील सांगितलं की फडणवीस यांना औरंगाबादला जायचं आहे त्यामुळे वेळेची मर्यादा आहे. आपण त्यांना पिंपरीतल्या कार्यक्रमात परत कधीतरी बोलवू. तेवढ्यात देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘या कार्यक्रमात मी पुन्हा येईन!’ देवेंद्र फडणवीस यांनी हे वाक्य उच्चारताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

मी पुन्हा येईन! हे वाक्य कसं समोर आलं? 

विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात पार पडली. त्याआधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनात एक कविता सादर केली होती. ज्यामध्ये ते मी पुन्हा य़ेईन असं म्हटले होते. त्यानंतर निवडणुकीचा प्रचार सुरु झाला तेव्हा त्या प्रचारादरम्यानही अत्यंत आक्रमकपणे देवेंद्र फडणवीस यांनी हे वाक्य अनेकदा भाषणानंतर वापरलं. हे वाक्य त्यांच्या निवडणूक प्रचाराचा अविभाज्य भागच झालं होतं. मात्र देवेंद्र फडणवीस हे सत्तेवर येऊ शकले नाहीत. आले तेदेखील अवघ्या अडीच दिवसांसाठी. कारण अजित पवार यांनी त्यांच्या सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर फडणवीस यांनीही अवघ्या अडीच दिवसात राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

‘मी पुन्हा येईनची खिल्ली!’

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं म्हणजेच महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा राज्यात स्थापन झालं तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री जयंत पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी मी पुन्हा येईन या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची यथेच्छ खिल्लीही उडवली. मात्र फडणवीस यांनी त्यांना वेळोवेळी प्रत्युत्तरंही दिली.

दरम्यान अशी सगळी पार्श्वभूमी असलेलं हे वाक्य आज पिंपरीतल्या फेस्टीव्हलदरम्यान झालेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा उच्चारलं. ज्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला.