महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना उधारीची कर्जमाफी जाहीर केली असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ही कर्जमाफी एकप्रकारे फसवी आहे. दिलेला शब्द या कर्जमाफीमध्ये पाळला जात नाही. या सरकारने जो शब्द दिला होता तो पाळलेला नाही असाही आरोप फडणवीस यांनी केला. सध्या CAA वरुन आंदोलनं, चर्चा, निदर्शनं सुरु आहेत. मात्र हा वाद राजकीय हेतूने प्रेरित वाद आहे. अल्पसंख्याक आणि मुस्लीम समाजाच्या मनात जाणीवपूर्वक भेद तयार करुन त्यांची माथी भडकवण्याचं काम काही पक्ष जाणीवपूर्वक करत आहेत असाही आरोप फडणवीस यांनी केला. CAA हा कोणाचंही नागरिकत्त्व हिसकावणारा नाही तर नागरिकत्व देणारा कायदा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांनी कर्जमाफी जाहीर केली. मात्र सातबारा कोरा करणार होतात त्याचं काय? शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार होतात त्याचं काय? असे प्रश्न उपस्थित करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांसह सभात्याग केला होता. जे सरकार विश्वासघाताने तयार झालं त्या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.