प्रभू रामचंद्र हे भारताचा आत्मा आहेत. त्यामुळेच ती जागा आक्रमणासाठी निवडली गेली असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आपल्या संस्कृतीचा आत्मा प्रभू श्रीराम आहेत. हे मीर बांकीला ठाऊक होतं. त्यामुळे त्याने अय़ोध्येतलं मंदिर १५२८ मध्ये पाडलं. तुमच्या संस्कृतीचा आत्माच आम्ही मिटवू शकतो हे त्याला दाखवून द्यायचं होतं. ही लढाई फक्त मंदिर-मशिदीची नव्हती. संस्कृतीवर करण्यात आलेल्या आक्रमणाचीही होती असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

रामजन्मभूमीचं आंदोलन हे गेले अनेक शतकं सुरु होतं. १५२८ मध्ये बाबराचा सेनापती मीर बांकी याने अयोध्येचं मंदिर तोडून तिथे मशिद बांधण्याचा प्रयत्न केला. अयोध्येत जागा कमी होती का?  केवळ राम मंदिराला लक्ष्य केलं गेलं. कारण एखाद्या समाजाला पराजित मानसिकतेत न्यायचं असेल तर त्या समाजाचा आत्मा मारावा लागतो ते मीर बांकीला माहित होतं. त्यामुळे संस्कृतीवर एक प्रकारचा घाला घातला गेला असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.   माधव भंडारी यांच्या अयोध्या या पुस्तकाचं प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी प्रवीण दरेकर, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा आणि अन्य नेते उपस्थित होते. २२ डिसेंबरला हे प्रकाशन झालं. या दिवसाला वेगळं महत्त्व आहे. कारण २२ डिसेंबर १९४९ रोजी वादग्रस्त वास्तूत श्रीरामचंद्र यांच्या मूर्ती ठेवल्या गेल्या असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“प्रभू श्रीराम आणि प्रभू श्रीकृष्णांनी जो वारसा आपल्याला दिला आहे तो इतका समृद्ध आहे की त्या वारशाने आपल्या देशात प्रत्येकाला जागा दिली. जगाने ज्या लोकांना त्रस्त केलं ते सगळे लोक भारतात आले. त्यांना भारताच्या हिंदू संस्कृतीने आपल्यामध्ये सामावून घेतलं. ज्यांनी आक्रमण केलं त्यांनाही सामावून घेतलं. जे आश्रित आले त्यांनाही सामावून घेतलं. त्यामुळे अशा समृद्ध संस्कृतीवर जो घाला घालण्यात आला होता त्याविरोधातली ही लढाई होती” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.