‘एफआरपी’वर मार्ग काढण्यासाठी समिती

अतिरिक्त साखर उत्पादनामुळे निर्माण होत असलेला प्रश्न सोडविण्यासाठी उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीबाबत तेल कंपन्याशी चर्चा करण्यात येत असल्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. उसाला एफआरपीनुसार पसे देण्यात येत असलेल्या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली असून या समितीला १० जानेवारीपर्यंत अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असेही त्यांनी सांगितले.

देशांतर्गत साखरेचे उत्पादन वाढल्याने साखर दराचा प्रश्न निर्माण होत आहे. बाजारातील साखरेचे दर पडले आहेत. उसापासून केवळ साखर उत्पादन न करता गाळपासाठी येत असलेल्या उसापकी २५ टक्के उसाच्या रसापासून थेट इथेनॉल तयार करायचा प्रस्ताव आहे.

इथेनॉल निर्मितीसाठी लागणारी गुंतवणूक बीओटी तत्त्वावर कंपन्यांनीच करायची, मात्र यासाठी लागणारी जागा कारखान्यांनी उपलब्ध करून द्यायची असा हा प्रस्ताव आहे. यामुळे कारखान्यांना उत्पन्नही मिळेल आणि जादा साखरेचा प्रश्नही निकाली निघेल असे त्यांनी सांगितले.

उसाला एफआरपीनुसार दर देण्यास पसे कमी पडत असतील तर शासनाची तिजोरी रिकामी करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देले होते.

याबाबत विचारणा केली असता तसा प्रस्तावच साखर कारखान्याकडून अद्याप आला नसल्याचे सांगत सहकार मंत्री म्हणाले की, तसा प्रस्ताव आला तर शासन सकारात्मक आहे, निश्चितच मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील.

ऊसदराबाबत निर्माण झालेल्या कोंडीबाबत अभ्यास करण्यासाठी  समिती स्थापन केली असून या समितीला १० जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही ते म्हणाले.